नागपूर : ‘कोल इंडिया’ने दिलेल्या सामाजिक दायित्व निधीतून भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईने (आयआयटी) ‘जीवोदया’ या नावाने रेशीम उत्पादनाच्या क्षेत्रात सलग तीन वर्षे संशोधन केले. यातून विकसित झालेल्या तंत्रज्ञानाद्वारे आता रेशीम किड्यांना न मारता रेशीमनिर्मिती करणे शक्य झाले आहे. आतापर्यंत रेशीम निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर किडे मारले जात होते, हे येथे उल्लेखनीय.
=
केंद्र आणि राज्य सरकारांकडून शेतकऱ्यांना पूरक व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले जाते. त्यात रेशीम उत्पादनाचाही समावेश आहे. ग्रामीण भागात उपयुक्त ठरतील अशा तंत्रज्ञानाचा विकास आयआयटी, मुंबईने या प्रकल्पाच्या माध्यमातून केला आहे. या नव्या पद्धतीत रेशीम किड्यांना कोष तयार न करता सपाट भागावर रेशीमी धागा विणण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. पारंपरिक रेशीम निर्मितीत धागा तुटू नये म्हणून रेशीम किड्यासह त्याने तयार केलेले कोष (रेशीमी जाळे) उकळले जातात आणि त्यामुळे किड्यांचा मृत्यू होतो. मात्र, ‘जीवोदया’ तंत्रज्ञानामुळे ही प्रक्रिया टाळता येते. त्यात किडे मारले जात नाहीत. सपाट पद्धतीच्या भागावर रेशीमी धागा तयार झाल्यानंतर किडे आपला नैसर्गिक जीवनक्रम पूर्ण करतात आणि पुढे पतंगाच्या रूपाने मुक्तपणे उडू शकतात.
नवीन संशोधनाला ‘जीवोदया रेशीम’ असे नाव देण्यात आले आहे. संशोधनाच्या अनेक टप्प्यांनंतर मिळालेले हे यश प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानातील ‘कोणीही दुःखी होऊ नये’ या विचाराशी सुसंगत असल्याचे संशोधकांचे मत आहे. कोल इंडियाने या उपक्रमाला संकल्पनेपासून यशाच्या अखेरच्या टप्प्यापर्यंतच्या सर्व पातळीवर सातत्याने सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून सहकार्य केले. नैतिक आणि पर्यावरणपूरक रेशीम निर्मितीसोबतच ही नवी पद्धत रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा शाश्वत मार्ग आणि ग्रामीण उपजीविकेला बळ देणारी ठरणार आहे. ‘जीवोदया’ प्रकल्पाच्या यशामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर अहिंसक आणि शाश्वत रेशीम उत्पादनाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
एका किलोग्रॅम रेशीमसाठी हजारो किड्यांची हत्या…
पारंपरिक रेशीम निर्मितीत रेशीम किडा (अळी) स्वतःभोवती कोष तयार करतो. हा कोष एका सलग, अतिशय बारीक रेशीमी धाग्याचा बनलेला असतो. रेशीम काढण्यासाठी हा धागा अखंडित हवा असतो. मात्र, किड्याला कोषातून बाहेर येऊन पतंग होऊ दिल्यास तो कोष फाडतो आणि रेशीमी धागा तुटून लहान तुकड्यांत विभागला जातो. धागा तुटू नये म्हणून पारंपरिक पद्धतीत कोष उकळत्या पाण्यात टाकले जातात किंवा वाफ दिली जाते. त्यामुळे कोषातील किडा मरतो आणि धागा सलग स्वरूपात काढता येतो. एका किलोग्रॅम रेशीमसाठी हजारो रेशीम किड्यांचा मृत्यू होतो. हीच पद्धत अहिंसक नसल्याने तिच्यावर टीका केली जाते.

