यवतमाळ : आयआयटी मुंबई येथे द्वितीय वर्षांत शिकत असलेल्या यवतमाळ येथील साहिल रवींद्र वाकोडे (१९) या विद्यार्थ्याने शुक्रवारी वसतीगृहाच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर मुंबई आयआयटीत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले, तर यवतमाळ येथे साहिलच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या वृद्ध आजीसह नातेवाईक साहिलला न्याय मिळावा म्हणून ठाण मांडून आहेत. ‘साहिल हा हुशार आणि प्रचंड मेहनती मुलगा होता. तो आत्महत्या करूच शकत नाही’, त्याचा खून करून आत्महत्येचा देखावा केला, असा दावा त्याची आजी आणि मोठी आई यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. जातीय छळ, विद्यार्थ्यांसमोर अपमान यामुळे मानसिकरित्या खचलेल्या साहिलचा आयआयटी मुंबईच्या व्यवस्थेने केलेला हा खून असल्याचा आरोपही त्याच्या नातेवाईकांनी यावेळी केला.

जेईई ॲडव्हान्समध्ये देशात ६१४ वी रँक

साहिलचे आई-वडील आज मुंबई येथे गेल्याने त्याच्या नातेवाईकांनी अधिक माहिती दिली. आर्णी तालुक्यातील आडवळणाच्या शेलू ब्राह्मणवाडासारख्या गावातून परिश्रम आणि अभ्यासाच्या जोरावर साहिला आयआयटीपर्यंत पोहोचला. साहिलचे दहावीपर्यंतचे शिक्षण यवतमाळातील सेंट अलॉयसिस शाळेत झाले. दहावीत सीबीएसई बोर्डात त्याला ९० टक्के गुण होते. बारावीमध्ये त्याने नागपूर येथून ‘जेईई’ची तयारी केली. जेईई ॲडव्हान्समध्ये त्याला ९४ टक्के गुण होते, तर, अनुसूचित जाती प्रवर्गात देशात त्याची ६१४ वी रँक होती. आयआयटी पवई येथे निवड झाल्यानंतर पहिल्या वर्षी त्याचे एसजीपीए ८.५ इतके होते, अशी माहिती त्याची मोठी आई गंगा विजय वाकोडे यांनी दिली. ‘तो अभ्यासात हुशार होता. राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन खेळाडू होता. तर मॅथ ऑलम्पियडमध्येही गोल्ड मेडलिस्ट होता. सर्वांशी जुळवून मोकळेपणाने वागणारा होता.

परीक्षेदरम्यान मोबाईल वापरल्याचा आरोप चुकीचा

साहिलने परीक्षेदरम्यान मोबाईलचा वापर केला, हा संस्थेने केलेला आरोप चुकीचा आहे. आयआयटीच्या परीक्षा कक्षात मोबाईल घेवून जाता येत नाही, तर साहिल मोबाईलचा वापर कसा करणार’, असा प्रश्न गंगा वाकोडे यांनी उपस्थित केला. मुंबईत साहिलच्या आत्महत्येनंतर होस्टेलला पोहोचल्यानंतर तेथील वातावरण आणि महाविद्यालयाकडून देण्यात येणारी माहिती यात खूप तफावत होती. आधी साहिलचा खून करून, त्याने गळफास घेतल्याचा देखावा करण्यात आल्याची शंका कुटुंबियांना असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. साहिलने मोबाईलचा वापर केला होता तर संस्थेने आधी त्याच्या पालकांना सुचित करायला हवे होते. त्याला अपमानित करून पेपर सोडवू न देता बाहेर काढण्यात आल्याने त्याच्या मनावर विपरित परिणाम झाला. संस्थेच्या चुकीमुळे एक कुटुंब उध्वस्त झाले, असे साहिलची मोठी आई म्हणाली.

आठ दिवसांपूर्वीच खोली बदलवली आणि…

येत्या आठवड्यात साहिल आयआयटी पवईतील विद्यार्थ्यांसोबत नागपूर येथे एआय सादरीकरणासाठी येणार होता. तो सतत हसतमुख असल्याने त्याचे सिनिअर विद्यार्थ्यांसोबत चांगले संबंध होते. गणेश चतुर्थीलाच त्याचे आई-वडील मुंबई येथे त्याला भेटून आले. त्यावेळी त्याने प्राध्यापकांकडून मानसिक छळ होत असल्याची तक्रार वडिलांकडे केली होती. मात्र, वडिलांनी त्याला अभ्यासाकडे लक्ष देण्याची सूचना केल्याने तो विषय तिघांतच राहिला, असे गंगा वाकोडे म्हणाल्या. आठ दिवसांपूर्वीच त्याने वसतीगृहातील खोली बदलवली होती आणि या नवीन खोलीतच त्याने जीवन संपविले, हे फारच क्लेषयदायक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

आयआयटीकडून माफीनामा…

आयआयटी मुंबईने, ‘साहिलच्या दुर्दैवी निधनाच्या परिस्थितीबाबत आमच्या यापूर्वीच्या निवेदनात करण्यात आलेल्या उल्लेखांबद्दल आम्ही दिलगीर आहोत. या घटनेपूर्वी नेमके काय घडले आणि त्यास कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीची चौकशी संबंधित सक्षम यंत्रणांकडून सुरू आहे. चौकशी अद्याप सुरू असताना, योग्य तपास प्रक्रियेद्वारे या बाबी अधिकृतपणे निश्चित होण्यापूर्वीच त्याच्या निधनापूर्वी घडलेल्या घटनांशी संबंधित तपशील मांडणे किंवा त्यांचे स्वरूप ठरवून भाष्य करणे अनुचित होते’, असे म्हटले आहे. त्यामुळे यापूर्वीच्या निवेदनातून मांडण्यात आलेली घटनाक्रमाची मांडणी अंतिम किंवा अधिकृत निष्कर्ष मानता येणार नाही, हे स्वतः संस्थेनेच स्पष्ट केले आहे.