पर्यावरणातील बदलांचे सूचक असणाऱ्या पाणवठय़ावरील स्थलांतरित पक्ष्यांच्या निरीक्षणादरम्यान तलावांच्या दुरवस्थेबाबत समोर आलेले चित्र भयावह आहे. अवैध मासेमारी, अवैध शेती आणि अवैध व्यवसाय तलावाच्या ऱ्हासासाठी कारणीभूत ठरले आहेत. या सर्व प्रकारांवर त्वरित नियंत्रण आणले गेले नाही, तर येत्या काही वर्षांत ते पूर्णपणे नामशेष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नागपूर शहर आणि परिसरात सुमारे ५० वर तलाव आहेत. यातील काही तलाव वनखाते, सिंचन खाते, जिल्हा परिषद, अशा विविध खात्यांच्या आणि प्रशासनाच्या अखत्यारीत येतात. मात्र, या तलावांकडे ना कोणत्या खात्याचे लक्ष आहे, ना प्रशासनाला लक्ष देण्यास वेळ आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या तलावांवरील अवैध धंद्यांना मोठय़ा प्रमाणावर ऊत आला असून तलावांची खरी ओळखच हळूहळू मिटत आहे.
पक्षी निरीक्षणाचा सोस गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढला आहे आणि याच पक्षीनिरीक्षणातूनच तलावांची दुरवस्था समोर आली आहे.
पर्यावरणा बदलाचा सूचक म्हणून स्थलांतरित पक्ष्यांकडे पाहिले जाते, पण याच पक्ष्यांच्या शिकारीसाठी तलावांवर शिकाऱ्यांकडून जाळे घातले जाते. ज्या ठिकाणी शिकार आणि त्याच ठिकाणी ते शिजवून पार्टीचा बेत तलावाच्या काठावरच आखला जातो. पक्षी अभ्यासकांनी कित्येकदा ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली, पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळेच शिकाऱ्यांची संख्याही वाढली आणि शिकारीही वाढले. पक्ष्यांच्या शिकारीसोबतच अवैध धंद्यांनाही ऊत आला आहे.
हिंगणा परिसरातील काही तलाव आणि इतरही अनेक तलावांवर चक्क अवैधरित्या देशी दारू तयार केली जात आहे. सुराबर्डीसारख्या रमणीय परिसरातील तलावाजवळील नको त्या धंद्यांमुळे त्या ठिकाणी जाण्यास पक्षीनिरीक्षक धजावत नाहीत. मासेमारीसाठी काही कालावधीकरिताच परवानगी दिली जावी, असा सूर पक्षीनिरीक्षक लावत आहेत, पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेल्यामुळे वर्षभर या तलावांवर मासेमारांचे जाळे पसरलेले असते. मास्यांना जाळ्याकडे वळवताना मच्छिमार मोठय़ाने आवाज करतात आणि त्यामुळे स्थलांतरितच नव्हे, तर स्थानिक पक्षीसुद्धा तलावाकडे पाठ फिरवून आहेत. तलावाचे पाणी ओसरल्यावर कोरडय़ा झालेल्या भागात सिंचन खात्याकडून शेतीसाठी दिली गेलेली परवानगी तलावांच्या ऱ्हासामागील आणखी एक कारण ठरले आहे. अवैध मासेमारी, अवैध धंदे, अवैध शेती अशा नानाविध कारणांनी तलाव विळख्यात घेतले आहेत. तलावांचे त्वरीत संवर्धन न केल्यास भविष्यकाळात शहरातील तलावांचे अस्तित्व नष्ट होण्याचे मार्गावर असतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

तलावांच्या सुरक्षेसाठी निसर्ग पर्यटनाचा ‘पॅटर्न’
तलावांच्या सुरक्षेसाठी निसर्ग पर्यटनाचा ‘पॅटर्न’ राबवला तर काही प्रमाणात तलाव सुरक्षित राखले जाण्याची शक्यता पक्षीनिरीक्षकांनी व्यक्त केली. निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने तलावाचे संरक्षण आणि संवर्धन करायला हवे. देहरादूरमधील आसान नदीवर निसर्ग पर्यटनाचा ‘पॅटर्न’ अतिशय उत्कृष्टपणे राबवण्यात आला आहे. त्याच धर्तीवर हे तलाव सुरक्षित केल्यास स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास वाचेल. परिणामी, तलावांचे सौंदर्य अबाधित राखले जाईल आणि अवैध धंद्यांना आळा बसेल, अशी अपेक्षा पक्षीनिरीक्षकांनी व्यक्त केली.