यवतमाळ : गोवा आणि मध्य प्रदेशातून आणलेल्या दारूची यवतमाळ जिल्ह्यात अवैध विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणला आहे.

बुधवारी पहाटे राळेगाव ते अल्लीपूर रोडवरील कळमनेर फाटा येथे विभागाने ही ’हायव्होल्टेज’ कारवाई करत अवैध दारूचा मोठा साठा पकडला. या ’सर्जिकल स्ट्राईक’मध्ये दारूच्या कंटेनरसह चार वाहनांमधून तब्बल एक कोटी पाच लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत तिन्ही आरोपींनी पलायन केले.

गुप्त माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कळमनेर फाटा येथे सापळा लावला होता. यावेळी अशोक लेलँड कंपनीचा १० चाकी कंटेनर संशयास्पद स्थितीत आढळला. तपासणी केली असता, त्यात वरवर अंड्यांचे कागदी क्रेट दिसत होते. मात्र, पथकाने कसून तपासणी केली असता त्यामागे गोवा आणि मध्य प्रदेशात निर्मित देशी-विदेशी मद्याचे ६१३ बॉक्स दडवून ठेवल्याचे उघड झाले.

त्याचवेळी टाटा कंपनीचा मालवाहू टेम्पो तपासला असता, त्यातही देशी मद्याच्या ३० पेट्या आढळले. ही कारवाई सुरू असतानाच तिथे दारू भरण्यासाठी तिसरे वाहन आले. मात्र, चाहूल लागताच चालकाने भरधाव वेगाने वर्धा जिल्ह्याकडे पळ काढला. पथकाने या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग केला आणि वर्धा जिल्ह्याच्या हद्दीत हे वाहन पकडले. या कारमध्ये देशी मद्याच्या ४० पेट्या आढळल्या.

मात्र, तिन्ही वाहनांमधील चालक अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना फरार घोषित करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात या रॅकेटमागे वर्धा जिल्ह्यातील कुख्यात दारू तस्कराचा हात असल्याचा संशय निरीक्षक पी. एस. बोढारे यांनी व्यक्त केला आहे.

वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असल्याने यवतमाळच्या सीमेवर दारू उतरवून तिथून ती वर्ध्यात पाठवण्याची पद्धती तस्करांनी अवलंबली आहे. ही कारवाई आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या आदेशानुसार विभागीय उपायुक्त डॉ. पराग नवलकर, अमरावती आयुक्त गणेश पाटील, यवतमाळ अधीक्षक नितेश शेंडे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक पी. एस. बोढारे, निरीक्षक दिवाकर वाघ आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.

अशी फसली कंटेनरची ’आयडिया’

कागदी अंड्यांचे क्रेट वाहून नेणारा हा कंटेनर समृद्धी महामार्गावरून यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर दाखल झाला होता. कंटेनरवर असलेल्या रिफ्लेक्टरच्या ’फुल व्हाईट’ पट्ट्यांमुळे एक्साईज पथकाचा संशय बळावला. कंटेनर थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने तो पळवला, मात्र पथकाने दोन्ही बाजूंनी घेराव घालून त्याला ताब्यात घेतले आणि कंटेनरमधून दारू वाहतुकीची ही आयडिया फसली.