अकोला : अवैध सावकारी प्रकरणात सहकार विभागाच्या नेतृत्वात तीन ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यानंतर चौकशीमध्ये गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी दाेघांविराेधात सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकाेला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दुकानासह एकूण तीन ठिकाणी छापा टाकण्यात आला होता. दिलीप सुवालाल बाफणा (रा. विवेकानंद आश्रम जवळ, सुधीर काॅलनी, सिव्हील लाईन्स अकाेला), व चेतन सुभाषचंद्र जैन (बाफणा) (रा. सिद्ध निवास, भारत विद्यालयाजवळ , अकाेला) अशी आराेपींची नावे आहेत.
महाराष्ट्र सावकारी अधिनियम या नवीन कायद्यानुसार जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार धाडीसाठी सहकार विभाग, महसूल विभाग आणि पोलीस दलाचा समावेश असलेले संयुक्त पथक गठित करण्यात आले. २९ नाेव्हेंबर २०२४ राेजी सहकार विभागाच्या नेतृत्वात अवैध सावकारीवर छापेमारी करण्यात आली होती.
एका व्यापाऱ्याच्या तीन ठिकाणांवर तीन पथकांद्वारे धाडसत्र राबवण्यात आले. अकाेल्यातील बाजार समितीमधील दुकानात २९ नाेव्हेंबर २०२४ राेजी सहकार विभागाने छापा टाकला. दिलीप बाफणा याच्या बाफणा ट्रेडिंग कंपनीमध्ये छापा टाकून तीन तास चौकशी करण्यात आली होती. छापा व नंतरच्या चाैकशी प्रक्रियेत कागदपत्रांसह अन्य बाबी जप्त करण्यात आल्या. यात धनादेश, व्याजाचा उल्लेख असलेली पावती, काेरे धनादेश, काेरे मुद्रांक पेपर, उधारी वही, बँक पासबुक नाेंदवही, व्हाऊचर स्लिप, रद्द केलेले धनादेश, संगणक आदींचा समावेश आहे.
या प्रकरणी तालुका उपनिबंधकांकडून चाैकशी करण्यात आली. अर्जदारांनी ३ रुपये द.सा.द.शे प्रमाणे २२ ताेळे साेने गहाण ठेवले हाेते, असे अहवालात नमूद आहे. शेतकऱ्यांचा माल विकत घेतानाही फसवणूक हाेते, असाही आराेप अर्जदारांनी केला हाेता. दरम्यान, सहकार अधिकाऱ्यांनी सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार आराेपींविरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनिमय २०१४ चे कलम ३० नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, असे नमूद केले. त्यानुसार सिव्हिल लाईन पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध सावकारी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ
अवैध सावकारी प्रकरणात दोन व्यापाऱ्यांकडे छापा टाकून झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईनंतर प्राप्त कागदपत्रांची पडताळणी व चौकशीमध्ये अवैध सावकारीचा गंभीर ठपका त्या दोघांवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी अवैध सावकारी प्रकरणात दोघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

