लोकसत्ता टीम
भंडारा : भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यातील काही गावांमधील नदीच्या काठावर असलेल्या अनेक वाळू घाटांवर होत असलेल्या तस्करी प्रकरणी दोषी कार्यकर्ते आणि अधिकारी- कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल मंत्र्यांना दिले आहेत. याबाबतीत आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटीत पत्र देऊन या रेती तस्करीत गुंतलेले दलाल, कार्यकर्ते व अधिकारी- कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली होती.
भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यातील काही गावांमधील नदीच्या काठावर असलेल्या अनेक रेती घाटांवर तस्करी होत असून या तस्करीत काही राजकीय कार्यकर्ते आणि शासकीय अधिकारी- कर्मचारी गुंतले असल्याकडे तुमसर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार राजू कारेमोरे यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्राद्वारे भंडारा जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या पत्राच्या आधारे आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली होती.
आमदार कारेमोरे यांनी वरिष्ठ अधिकारी आणि सरकारबाबतही काही गंभीर आरोप केले होते. एका जबाबदार लोकप्रतिनिधीने अशी तक्रार केल्यानंतर त्या तक्रारीची शासनाद्वारे त्वरित आणि गंभीर दखल घेण्याची गरज व्यक्त करीत आमदार डॉ. फुके यांनी या संपूर्ण भ्रष्टाचारात आणि अवैध रेती तस्करीमध्ये जे कार्यकर्ते, कर्मचारी-अधिकारी गुंतलेले आहेत, त्या सर्वांवर आपण कडक कारवाई करावी अशी विनंती मुख्यामंत्र्यांकडे केली होती.
मोहाडी तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी या तस्करी प्रकरणात दोषी आढळतील त्यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करून त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार दाखल करण्याचे आणि त्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्याचे अत्यंत गरजेचे आहे. आमदार राजू कारेमोरे यांनी ज्या पोटतिडकीने हा विषय मांडलेला आहे, ती तळमळ व सत्य परिस्थिती लक्षात घेता, तुमसर मतदार संघात सुरू असलेल्या या गैरप्रकाराला आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्याची गरज आहे.
या सर्व प्रकारामुळे भंडारा जिल्ह्याची बदनामी होत असल्याकारणाने आमदार कारेमोरे यांनी केलेल्या तक्रारीचा गांभीर्यापूर्वक विचार करता या प्रकरणी सविस्तर चौकशीचे आदेश जिल्हा प्रशासनाला देऊन या विधानसभा मतदार संघातील अवैध वाळू तस्करीमध्ये गुंतलेले सर्व अधिकारी-कर्मचारी तसेच राजकीय कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश तात्काळ देण्यात यावे, अशी विनंती आमदार डॉ. फुके यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सबंधित दोषी अधिकारी- कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश महसूल मंत्र्यांना दिले आहेत.