नागपूर : औषध विक्रीचा परवाना असलेले नेहमीचे दुकान… मात्र अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) पथक तपासणीसाठी पोहोचले आणि आत आढळलेल्या साहित्याने अधिकाऱ्यांचा संशय बळावला. सुमारे ४० किलो ‘टेस्टोस्टेरॉन’ असल्याचा संशय असलेली पावडर, लेबल नसलेल्या कुप्या, रिकाम्या कुप्या, झाकणे, कुप्या बंद करण्याचे यंत्र, तयार छापील लेबले आणि खोकी तेथे आढळल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एवढे साहित्य नेमके कशासाठी होते? औषध विक्रीच्या परवान्याआड येथे स्टेरॉइड औषधांची निर्मिती, पुनर्भरण आणि लेबलिंग सुरू होते का? एफडीएच्या तपासणीनंतर प्रयोगशाळेचा अहवाल आला आणि जवळपास आठ महिन्यांनी हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचले.
एफडीएला नेमका संशय कसा आला?
एफडीएच्या पथकाने २९ डिसेंबर २०२५ रोजी ‘ऑल मेडिसिन्स डॉट कॉम’च्या मालिका अपार्टमेंटमधील दुकान आणि परिसराची तपासणी केली. या दुकानाला औषध विक्रीचा परवाना होता. मात्र, परिसरात औषध तयार करण्यासाठी वापरता येणारे साहित्य मोठ्या प्रमाणात आढळल्याने परवान्याविना औषध निर्मिती होत असल्याचा संशय निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
४० किलो पावडरीसोबत आणखी काय सापडले?
तपासणीदरम्यान ‘टेस्टोस्टेरॉन’ असल्याचा संशय असलेली सुमारे ४० किलो पावडर आढळली. त्यासोबत लेबल नसलेल्या कुप्या, पावडरची पाकिटे, मोठ्या प्रमाणावर रिकाम्या कुप्या व झाकणेही सापडली. कुप्या बंद करण्याचे यंत्र, वजनकाटा, शीतकपाट, छापील लेबले आणि तयार खोकीही आढळल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
कोणत्या स्टेरॉइडची नावे समोर आली?
तपासणीतील साहित्यावर ‘टेस्टोस्टेरॉन एनन्थेट’, ‘नॅन्ड्रोलोन’ आणि ‘बोल्डेनोन’ यांसह विविध औषधांची नावे असल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे एफडीएने तेथील नमुने ताब्यात घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले.
प्रयोगशाळेच्या अहवालाने संशय वाढला का?
होय. जप्त केलेल्या नमुन्यांपैकी एका नमुन्यात ‘टेस्टोस्टेरॉन एनन्थेट’ आढळल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालात नमूद करण्यात आले. संबंधितांकडून आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली नसल्याचेही एफडीएच्या तक्रारीत म्हटले आहे.
अखेर गुन्हा कोणावर दाखल झाला?
औषध निरीक्षक स्वाती सुधाकर भरडे यांच्या तक्रारीवरून ४ सप्टेंबरला राणाप्रतापनगर पोलिसांनी हरवश रणवीरसिंह आणि यश सुनील उईके या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. परवान्याविना औषधांची निर्मिती, पुनर्भरण, लेबलिंग आणि विक्री केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या आरोपांबाबत पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
