भंडारा : जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील चिखला मँगनीज खाण परिसरात वन माफियांनी हिरवीगार सागवानाची ५० ते ५५ झाडे बेकायदेशीरपणे कत्तल केल्याची गंभीर बाब समोर आली आणि वन विभाग खडबडून जागे झाले. खाण व्यवस्थापनाच्या सुरक्षेला चकवा देऊन वन माफियांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली असून, मौल्यवान लाकूड लंपास करण्याचा प्रयत्न केला.
तुमसर तालुक्यातील चिखला खाण परिसर हा दाट वनक्षेत्राला लागून असल्याने येथे वारंवार सागवान तस्करीच्या घटना घडत असतात. चिखला मँगनीज खाण परिसरातील ही घटना अत्यंत गंभीर असून, यात प्रशासकीय दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येत आहे.चिखला खाण परिसरातील गट क्रमांक ६६९ मधून सुमारे ५० ते ५५ मौल्यवान सागवान झाडे तोडण्यात आली आहेत. ही जमीन महसूल विभागाच्या अखत्यारीत असून ती चिखला खाण प्रशासनाला भाड्याने देण्यात आली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रामटेके यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखला महसूल विभागांतर्गत येणाऱ्या गट क्रमांक ६६९ मध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वृक्षतोड झाल्याचे उघडकीस आली आहे. याप्रकरणी वनविभागाने धडक मोहीम राबवून ३७ नग सागवान जप्त केले या कारवाईमुळे लाकूड तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
दोन पथकांद्वारे शोधमोहीम..
गट क्रमांक ६६९ वरील सागवान वृक्षांची कत्तल झाल्याची माहिती मिळताच, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रामटेके यांच्या नेतृत्वाखाली विशेष शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेसाठी दोन स्वतंत्र पथके नेमण्यात आली होती. पथक १ मध्ये क्षेत्रसहायक एस. एम. शेंडे, वनरक्षक दिनेश खोटोले, श्रीमती आर. एम. शेंडे तर पथक २ मध्ये क्षेत्रसहायक डी. ई. यादव, व्ही. एच. पंचबुधे, पी. डी. हुमने आहेत.
१ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त…
आत्तापर्यंत झालेल्या या शोध मोहिमेत चिखला परिसरातून १.८७ घनमीटर आकारमानाचे एकूण ३७ नग सागवान जप्त करण्यात आले. या जप्त केलेल्या मालाची अंदाजे किंमत १ लक्ष २० हजार रुपये असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.
आरोपी फरार, तपास सुरू..
जप्त केलेले सागवान शासकीय विक्री आगार, चिचोली येथे सुरक्षित ठेवण्यात आले आहे. या वृक्षतोडीमागे असलेल्या मुख्य आरोपींचा शोध घेण्यासाठी वनविभागाचे पथक कसून तपास करत आहे. या कारवाईमुळे परिसरात अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर जरब बसली असून, वनसंपदेचे रक्षण करण्यासाठी वनविभाग सतर्क असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही वृक्षतोड वर्दळीच्या मुख्य रस्त्याजवळ (चिखला बस्ती) झाली असूनही कुणालाही सुगावा न लागल्याने नाकाडोंगरी परिसरातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि जुन्या सागवान वृक्षांची कत्तल होणे ही साधी गोष्ट नाही. विशेष म्हणजे दोन ते अडीच फूट घेराची झाडे तोडण्यासाठी इलेक्ट्रिक किंवा पेट्रोल करवतींचा वापर होतो, ज्याचा आवाज बराच लांबपर्यंत जातो. तो प्रशासनापर्यंत न पोहोचणे आश्चर्यकारक आहे.इतकी मौल्यवान झाडे तोडून त्यांची विल्हेवाट लावणे हे काही तासांचे काम नाही. यासाठी मोठे मनुष्यबळ आणि वाहतुकीसाठी वाहनांची गरज लागते.
नाकाडोंगरी आणि गोबरवाही परिसर सातपुडा रांगांच्या जवळ असल्याने येथे वनविभागाची गस्त अधिक कडक असणे अपेक्षित होते.

