वर्धा : इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) तर्फे आंदोलन सूरू झाले आहे. त्याचा परिणाम म्हणजे आरोग्यसेवा ठप्प पडणार. रुग्णांची तारांबळ उडणार. डॉक्टर दोषी ठरणार. या पार्श्वभूमीवर डॉक्टर संघटनेने आपली भूमिका मांडली आहे. महाराष्ट्र राज्यातील IMA, MARD, ASMI आणि इतर वैद्यकीय संघटनांच्या संयुक्त आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर करत आहे, असे वर्धा संघटनेने स्पष्ट केले.
कोणत्याच पॅथीला विरोध नाही
संघटनेने नमूद केले की IMA कोणत्याही वैद्यकीय पद्धतीच्या विरोधात नाही. आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, सिद्ध, आधुनिक वैद्यक (Allopathy) अशा प्रत्येक मान्यताप्राप्त वैद्यकीय शाखेला भारतीय कायद्याने स्वतंत्र स्थान व मान्यता दिली आहे. प्रत्येक शाखेचे स्वतःचे शैक्षणिक अभ्यासक्रम, उपचारपद्धती आणि कार्यक्षेत्र निश्चित केलेले आहे. प्रत्येकाची ओळख निश्चित झाली आहे.
आमचा विरोध ‘पॅथी’ला नसून ‘मिक्सोपॅथी’ला
रुग्णांवर उपचार करताना प्रत्येक वैद्यकीय शाखेने आपल्या कायदेशीर आणि शैक्षणिक कार्यक्षेत्रात राहूनच उपचार करणे आवश्यक आहे. अपुरे प्रशिक्षण किंवा संबंधित विषयातील अधिकृत पात्रता नसताना दुसऱ्या शाखेतील उपचार करण्यास परवानगी देणे हे रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर परिणाम करणारे ठरू शकते.BHMS-CCMP नोंदणीचा प्रश्न हा याच तत्त्वाशी संबंधित आहे. कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेचा अंतिम निर्णय येण्यापूर्वी अशा प्रकारची नोंदणी सुरू करणे हे वैद्यकीय व्यवस्थेत गोंधळ निर्माण करणारे असून रुग्णांच्या हिताला बाधा पोहोचवू शकते, अशी IMA ची भूमिका आहे.
आमची भूमिका अतिशय स्पष्ट
प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, वैज्ञानिक आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळणे हा त्याचा मूलभूत हक्क आहे. ज्या वैद्यकीय पद्धतीचा उपचार दिला जात आहे, त्या पद्धतीचे संपूर्ण शिक्षण, प्रशिक्षण व कायदेशीर पात्रता असलेल्या डॉक्टरांकडूनच तो उपचार झाला पाहिजे. रुग्णाच्या जीवाशी कोणतीही तडजोड होऊ नये, हीच आमची भूमिका आहे.
कोणासही विरोध नाहीच
सुरू करण्यात आलेले आंदोलन हे कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाखेविरोधात नसून रुग्ण सुरक्षा, वैद्यकीय शिक्षणातील वैज्ञानिक निकष, वैद्यकीय व्यवसायाची नैतिकता आणि सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण यासाठी आहे. IMA चा ठाम विश्वास आहे की भारतातील सर्व वैद्यकीय शाखांनी परस्पर सन्मान, सहकार्य आणि आपल्या-आपल्या कार्यक्षेत्राचा आदर राखत समाजाची सेवा करावी. मात्र, एका शाखेतील व्यक्तींना दुसऱ्या शाखेतील उपचार करण्यास परवानगी देणे हा उपाय नसून त्यामुळे रुग्णांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याचा धोका वाढतो.
नागरिकांना विनंती
IMA वर्धा नागरिकांना आश्वस्त करू इच्छिते की आमचे हे आंदोलन जनतेच्या विरोधात नाही. रुग्णांचे प्राण वाचवणे, उपचारांचा दर्जा टिकवून ठेवणे आणि प्रत्येक रुग्णाला पात्र डॉक्टरांकडून योग्य उपचार मिळावेत, यासाठीच आम्ही संघर्ष करत आहोत. आम्ही राज्य शासनाला विनंती करतो की न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत BHMS-CCMP नोंदणी प्रक्रिया स्थगित ठेवावी आणि सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून रुग्णहिताला प्राधान्य देणारा निर्णय घ्यावा.
संघटना नेते म्हणतात…
IMA वर्धाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप सुने, सचिव डॉ. विवेक चकोले
सचिव तसेच मार्गदर्शक डॉ. अरुण पावडे, पदाधिकारी डॉ. सचिन पावडे यांनी पत्रकार परिषदेत आवाहन केले की प्रत्येक वैद्यकीय शाखेने आपली कायदेशीर भूमिकाच पार पाडावी. आमची न्याय्य भूमिका सरकार समजून घेईल, असा विश्वास संघटना पदाधिकारी व्यक्त करतात.
