नागपूर : मोसमी पावसाने संपूर्ण देश व्यापला असतानाच राज्यातील विविध भागात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती सक्रिय असल्याने पाच दिवस किनारपट्टी भागात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मुंबई, ठाण्यासह किनारपट्टीवर तीव्र अलर्ट देण्यात आला आहे. तर तळ कोकणसह किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
साधारणपणे आठ जुलैपर्यंत नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देश व्यापतात. यंदा नऊ दिवस अगोदर २९ जूनलाच मोसमी वाऱ्यांनी सर्व देश व्यापला आहे. एक जूनला केरळमध्ये दाखल होणारा पाऊस यंदा लवकर २४ मे रोजी दाखल झाला. त्यानंतर २५ मे रोजी मोसमी पाऊस तळकोकणात दाखल झाला. लगेच दुसऱ्या दिवशी मोसमी वाऱ्यांनी आगेकूच सुरू केली. मोसमी पावसाने राज्य व्यापले तरीही पावसाने मात्र पाठ फिरवली होती.
मोसमी पावसाचे वारे राज्यात दाखल झाले, पण पाऊस दडी मारून बसल्याने चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, गेल्या आठवडाभरापासून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भातील अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या वाहून गेल्या. या पावसामुळे राज्यातील अनेक भागात नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि राज्याच्या जलसाठ्यात देखील वाढ झाली आहे.
हवामान खात्याचे म्हणणे काय ?
राज्यात आज सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तळकोकणासह विदर्भात देखील हायअलर्ट देण्यात आला आहे. सोमवारी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तर मंगळवारी तळकोकणासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील जिल्हे व संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
आतापर्यंत पाऊस किती ?
जूनमध्ये राज्यात सरासरीच्या ९३ टक्के पाऊस पडला आहे. जूनची सरासरी २०८ मिलीमीटर आहे. यंदा आतापर्यंत १९४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. १५५ तालुक्यांमध्ये सरासरीच्या शंभर टक्के पाऊस झाला आहे. ८७ तालुक्यांत सरासरीच्या ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. ३८ तालुक्यांमध्ये सरासरीच्या २५ ते ५० टक्के पावसाची नोंद झाली आहे. पूर्व विदर्भ आणि मराठवाडा वगळता सरासरी एवढा पाऊस झाला आहे.