नागपूर : मोसमी पावसाचा लांबलेला प्रवास आणि त्यानंतर अवकाळी पावसाचा मारा झाल्यानंतर आता थंडीची लाट नागरिकांना सहन करावी लागणार आहे. राज्यात एक नाही तर तब्बल तीन महिने थंडीचा कडाका सहन करावा लागणार आहे. भारतीय हवामान खात्याने तसा इशारा दिला आहे.

नोव्हेंबर महिन्यात कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली होती, पण लगेच वातावरणात बदल होऊन किमान तापमानात वाढ झाली. आता पुन्हा गेल्या काही महिन्यांपासून थंडीला सुरुवात झाली आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी या आगामी हिवाळी हंगामात; तसेच डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रासह मध्य भारतात किमान आणि कमाल तापमान सरासरीइतके किंवा त्यापेक्षा कमी राहण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र खात्याने (आयएमडी) वर्तवला आहे.

यंदाच्या हिवाळ्यात राज्यात थंडीच्या लाटांचे दिवस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यताही भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्यातर्फे हिवाळ्यातील हवामानाचा अंदाज सोमवारी जाहीर करण्यात आला. यावर्षी महाराष्ट्रासह मध्य भारतात थंडीचा कडाका जाणवण्याचे संकेत भारतीय हवामान खात्याने दिले.

खात्याने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांत मध्य महाराष्ट्र आणि कोकणात किमान तापमान सरासरीच्या दरम्यान, तर मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. याच कालावधीत राज्याच्या बहुतांश भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहू शकते.

महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगण, मध्य प्रदेश, गुजरात आणि पूर्व राजस्थान या प्रदेशांत यंदाचा हिवाळा तीव्र राहू शकतो. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश हरियाणा येथे थंडीच्या लाटांचे दिवस सरासरीपेक्षा तीन ते पाच दिवस जास्त राहू शकतात. डिसेंबरमध्ये उत्तर महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असून, राज्यात इतरत्र किमान तापमान सरासरीइतके राहू शकते.

या महिन्यात मराठवाड्यात थंडीच्या लाटांचे दिवस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. पूर्व किनारपट्टी, गुजरात, मध्य महाराष्ट्र, कोकणाचा उत्तर भाग आणि बिहार येथे डिसेंबरमध्ये पाऊस सरासरीइतका किंवा त्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यताही भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

देशातील उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय राज्यांमध्ये पुन्हा एकदा तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असून, थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशपासून अगदी देवभूमी उत्तराखंडमध्येसुद्धा किमान तापमानाच प्रचंड घट झाल्याने अतीव उंचावरील भागांमध्ये तापमानात मोठी घट आली आहे. तर, मैदानी क्षेत्रांमध्ये पावसाच्या सरींचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तरेकडे वाढलेल्या या थंडीच्या कडाक्याचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होत असून, राज्यातही किमान तापमानात घट झाल्याची बाब लक्षात येत आहे.