नागपूर: कृषी विभागातील राजपत्रित अधिकारी गट अ आणि गट ब मधील मंजूर २५८ पदांचा, रिक्त असलेल्या अन्य १ हजार १८ पदांचा समावेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २५ ऑगस्ट रोजी घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेत करण्याची मागणी स्पर्धा परीक्षार्थ्यांकडून करण्यात आली आहे. या संदर्भात तातडीने कार्यवाही न झाल्यास स्पर्धा परीक्षार्थी राज्यव्यापी आंदोलनाच्या तयारीत आहेत.
कृषी विभागात १ हजारपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. प्रत्येक अधिकाऱ्याकडे दोन-तीन पदांची जबाबदारी आहे. २०२१च्या २०३ आणि २०२२च्या २१४ जागांसाठी झालेल्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना अद्याप नियुक्ती मिळालेली नाही. कृषी विभागाने २५८ जागांचे मागणीपत्र एमपीएससीला देऊनही एमपीएससीने जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही. या २५८ जागांची जाहिरात प्रसिद्ध करून त्यांचा समावेश २५ ऑगस्टला होणाऱ्या राज्यसेवा परीक्षेत करावा. अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत एमपीएससीने महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा – अमरावती : कॅफेआड युगुलांचे अश्लील चाळे!
अकरा महिन्यांपासून ‘कृषी’चे विद्यार्थी प्रतीक्षेतच
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेतून २०२ उमेदवारांची निवड करण्यात आली. या उमेदवारांची शिफारस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे करण्यात आली आहे. असे असतानाही मागील १२ महिन्यांपासून त्यांना नियुक्ती मिळालेली नाही. ‘एमपीएससी’कडून २०२१ मध्ये कृषी उपसंचालक (वर्ग १) १९, तालुका कृषी अधिकारी (वर्ग २) ६१, मंडळ कृषी अधिकारी (वर्ग २)-१२२ अशा एकूण २०२ पदांसाठी जाहिरात देण्यात आली. यानंतर मुख्य परीक्षा व मुलाखत घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांची शासनाकडे शिफारस केली. परंतु, नियुक्तीची प्रक्रिया कृषी विभागाकडून अजूनही पूर्ण झालेली नाही.
‘एमपीएससी’ची थेट भूमिका काय?
महाराष्ट्र कृषि सेवा गट-अ व गट-ब संवर्गातील एकूण २५८ पदांचे मागणीपत्र आयोगास १६ ऑगस्ट, २०२४ रोजी शासनाकडून प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २९ डिसेंबर, २०२३ रोजी प्रसिद्ध केलेल्या परीक्षा योजनेनुसार महाराष्ट्र कृषी सेवेतील पदे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षेतून भरण्यात येणार असल्याचे नमूद केलेले आहे. तथापि, सदर परीक्षेसंदर्भात २९ डिसेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत आयोगाकडे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा २०२४ साठी मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले नसल्याने, सदर कृषी सेवेतील पदांचा समावेश जाहिरातीमध्ये करणे शक्य झाले नाही. राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २५ ऑगस्ट, २०२४ रोजी घेण्यात येत असून सद्यस्थितीत प्रस्तुत परीक्षेशी संबंधित सर्व पूर्व तयारी झालेली आहे. प्रस्तुत परीक्षेमध्ये कृषी सेवेतील पदांचा समावेश करणे शक्य नसल्याने महाराष्ट्र कृषी सेवेतील प्राप्त मागणीपत्रातील पदांच्या भरतीप्रक्रियेबाबत पुढील नियोजन लवकरात लवकर करण्यात येईल.