scorecardresearch

युक्रेनमधील विद्यार्थ्यांना आरोग्य विद्यापीठात सामावून घेणे अशक्य- कुलगुरूंची स्पष्टोक्ती

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी या विषयावर भाष्य केले होते

(संग्रहित छायाचित्र)

नागपूर : युक्रेनमधून महाराष्ट्रात परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकमध्ये सामावून घेणे तांत्रिकदृष्टय़ा अशक्य वाटते. कारण, युक्रेन आणि भारतातील वैद्यकीय अभ्यासक्रम अगदीच भिन्न आहेत, असे स्पष्ट मत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या कुलगुरू व लेफ्टनंट जनरल (निवृत्त) माधुरी कानिटकर यांनी व्यक्त केले. 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी या विषयावर भाष्य केले होते. त्यानंतर तातडीने विद्यापीठाकडून यावर काम सुरू झाले. त्याअंतर्गत युक्रेनमधील वैद्यकीय अभ्यासक्रम, त्याची पद्धतीची माहिती घेतली गेली. तेथे विद्यार्थ्यांना पाठवणाऱ्या मध्यस्थांशी चर्चा करण्यात आली. यावेळी युक्रेन आणि भारतातील अभ्यासक्रमात खूपच फरक आढळला. दुसरीकडे भारतात निटमध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळवणे गरजेचे आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना येथे थेट सामावून घेणे अडचणीचे आहे. ही सर्व निरीक्षणे विद्यापीठाने वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसमोर मांडली.  या विद्यार्थ्यांना तेथील अभ्यासक्रमानुसार ऑनलाइन शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत करणे शक्य आहे. परंतु  त्यांना तेथेच ही परीक्षा पुढे द्यावी लागेल. परंतु केंद्राने जर काही धोरणात्मक निर्णय घेतल्यास त्यात बदल होऊ शकतो. तेथे यंदा एमबीबीएसच्या प्रथम वर्षांला असलेल्या विद्यार्थ्यांना काहीही शिकवण्यात आले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना निटची परीक्षा देऊन येथे एमबीबीएसला  प्रवेश मिळवणेच जास्त योग्य ठरेल, याकडेही कानिटकर यांनी लक्ष वेधले.

विद्यापीठ कायद्यात सुधारणेसाठी समिती

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा कायदा खूप जुना आहे. या कायद्याचा संपूर्ण अभ्यास करून त्यात सुधारणेसाठी वैद्यकीय शिक्षण खात्यासोबत समन्वय साधून काम होणार आहे. त्यासाठी विद्यापीठाकडून विधि, वित्त आणि परीक्षेचा अभ्यास असलेल्या प्रत्येकी एका अधिकाऱ्याचे नाव वैद्यकीय शिक्षण विभागाला सुचवण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण खात्याकडून या सुधारणेबाबत पुढे निघणाऱ्या यादीत ही नावे असतील.  या कायद्याचा सूक्ष्म अभ्यास करून वैद्यकीय शिक्षण विभाग आणि आरोग्य विद्यापीठ या सुधारणा संयुक्तरित्या करेल, असेही कानिटकर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Impossible to accommodate students from ukraine in a medical university madhuri kanitkar zws

ताज्या बातम्या