अकोला : जिल्ह्याच्या बार्शिटाकळी तालुक्यातील सारकिन्ही येथे अकरावी पास युवकाने चक्क तज्ज्ञ डॉक्टर भासवून रुग्णांवर उपचार केले. गेल्या सहा महिन्यांपासून हा धक्कादायक प्रकार ग्रामीण भागात सुरू होता. या प्रकरणात पिंजर पोलिसांनी बोगस डॉक्टराला बेड्या ठाेकल्या आहेत. आरोग्य विभागाने घेतलेल्या झाडाझडतीमध्ये त्या युवकाकडे मुदतबाह्य औषध साठा देखील आढळून आला. बार्शिटाकळी तालुक्यात सारकिन्ही गाव आहे. या गावात पुरेशा वैद्यकीय सेवा नव्हत्या. हे पाहून तोतया डॉक्टर विश्वजित मृत्युंजय विश्वास (२१, रा. हैदर बेलिया, पोलीस स्टेशन हावरा, जि. बराशात, कोलकाता) याने गावात दवाखाना सुरू केला. या दवाखान्यात तो रुग्णांची तपासणी करून उपचार करीत होता.

गावातील रुग्णांसह आजूबाजूच्या गावातील गरजू रुग्ण देखील त्याच्याकडे उपचारासाठी येत होते. दरम्यान, काही ग्रामस्थांना त्या तोतया डॉक्टरवर संशय आला. ग्रामस्थांनी पिंजर पोलिसांना बोगस डॉक्टर विश्वजित विश्वास याची माहिती दिली. या गंभीर प्रकरणाची दखल पिंजर पोलिसांनी घेऊन बोगस डॉक्टराचे निवासस्थान गाठले. तज्ज्ञांच्या मदतीसाठी पोलिसांनी प्रकरणाची माहिती आरोग्य विभागाला दिली. आरोग्य पथकाच्या चमूने सारकिन्ही गावात दाखल होऊन बोगस डॉक्टराच्या दवाखाना व निवासस्थानाची झाडाझडती घेतली. त्याच्या प्रमाणपत्रांची देखील तपासणी केली. तपासणीत धक्कादायक प्रकार समोर आला. त्या युवकाकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे नव्हती. हा युवक केवळ अकरावी पास असल्याचा गंभीर प्रकार तपासात समोर आला आहे.

हेही वाचा : Video: बुलढाण्यात कृषी केंद्रात पेट्रोल टाकून लावली आग

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र आर्या आणि त्यांच्या चमूने चौकशी करीत या तोतया डॉक्टराचा बनावटपणा उघडकीस आणला. डॉ. रवींद्र आर्या, महान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी किरण साबे यांच्यासह वैद्यकीय पथक व पोलिसांनी तोतया डॉक्टरकडे केलेल्या तपासणीत मुदतबाह्य इंजेक्शन, गोळ्या, सलाईन, औषधांच्या बाटल्या आदींसह इतर साहित्य आढळून आले आहे. महागडे इंजेक्शन आणि बनावट औषधांचा साठा देखील तोतया डॉक्टरकडे मिळून आला. एक युवक तोतया डॉक्टर बनून सहा महिन्यांपासून रुग्णांची फसवणूक करीत होता. सोबतच ग्रामस्थांच्या जीवाशी देखील खेळत होता. पिंजर पोलिसांनी तोतया डॉक्टर विश्वजित मृत्युंजय विश्वास याला अटक केली आहे. नागरिकांनी अशा बोगस डॉक्टरकडे जाऊ नये व जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांची माहिती पोलिसांसह आरोग्य विभागाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.