अकोला : शहरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर २५ वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वेस्थानक चौकातून मुलीला दुचाकीवरून नेत नराधम तरुणाने अत्याचार केला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी कसून तपास सुरू केला. अत्याचार करणाऱ्या तरुणाची ओळख पटली असून तो सध्या फरार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीसह अकोला शहरात आली होती. तिच्या मैत्रिणीकडे आली होती. रविवारी रात्री आपल्या दुसऱ्या अल्पवयीन मैत्रिणीसोबत शहरातील रेल्वेस्थानक चौकात उभी होती. त्याचवेळी एक २५ वर्षीय अनोळखी तरुण दुचाकीवरून आला. त्या नराधम तरुणाने अल्पवयीन मुलीला फुस लावून दुचाकीवर घेऊन घेता. नराधम तरुणाने मुलीला अकोट फैल परिसरातील निर्जन स्थळी नेऊन जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर नराधम तरुणाने परत पीडितेला रेल्वेस्थानक चौकात आणून सोडले.
घडलेल्या प्रकारासंदर्भात अल्पवयीन पीडित मुलीने आपल्या नातेवाइकांना सांगितले. पीडित मुलीसह नातेवाईकांनी रामदास पेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या गंभीर घटनेची तातडीने दखल घेत पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून त्याचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.
अल्पवयीन मुलीला गर्भवती करणारा आरोपी कोठडीत
दुसऱ्या एका प्रकरणात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी अकोट न्यायालयाने आरोपीची पोलीस कोठडीमध्ये रवानगी केली. ०६ रोजी रात्री आरोपीला अटक केली होती. सरकारी वकील अजित देशमुख यांनी अकोट सत्र न्यायालयात आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्याची मागणी केली. या प्रकरणात १३ वर्षीय पीडितेच्या आईने अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी सचिन गोमासे याच्या विरुद्ध तक्रार दिली.
०९ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास १३ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी घरी एकटी असतांना आरोपीने जबरदस्तीने अत्याचार केला. कोणाला काही सांगितले तर मारून टाकण्याची धमकी देखील दिली. त्यामुळे पीडितेने कोणाला काही सांगितले नाही. काही दिवसानंतर अल्पवयीन पीडितेचे पोट दुखत असल्यामुळे तपासणीमध्ये ती गर्भवती असल्याचे समोर आले. या प्रकरणी दाखल तक्रारीनंतर आरोपी सचिन गोमासे याला पोलिसांकडून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला ९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.