अकोला : केवळ मुस्लिमांवरच नाही, तर हिंदू, दलित नागरिकांवरही अन्याय होतात. जाती-धर्म पाहून नव्हे तर मनुष्यावरील अन्यायाविरोधात बोलत राहणार आहे. पहलगाम हल्ल्यात क्रूर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदू बांधवांवर हल्ला केला, त्यावेळी सर्वप्रथम आम्हीच खडेबोल सुनावले. भारतीय नागरिकांवर हल्ला झाला होता, ते पाकिस्तानातून आलेले दहतवादी होते. भारतीयांवर अन्याय कदापी सहन करणार नाही. काँग्रेसला केवळ निवडणुकीतच मतदानासाठी नागरिकांची आठवण येते, अशी टीका ‘एआयएमआयएम’ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आज येथे केली.

अकोला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर प्रचार सभा शनिवारी झाली. यावेळी ते बोलत होते. उमेदवारांसह पक्षाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. महापालिका निवडणुकीच्या प्रचारात अकोल्यात ओवैसी यांची ही दुसरी सभा झाली. ‘एआयएमआयएम’ने अकोल्यात ३७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवून काँग्रेसपुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे. सभेमध्ये खा. ओवैसी यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवरही जोरदार टीका केली.

पुढे ते म्हणाले, ‘अडचणी व दंगलीच्या काळात काँग्रेसवाले कधी आले का? आता निवडणुका आले तर खा. ओवैसीवर टीका करीत फिरत आहेत. मी भारतातील प्रियसी असून सर्वांचेच माझ्यावरच प्रेम आहे. मात्र, हे प्रेम करणे महागात पडेल. गरीबांसाठी प्राण देणाऱ्यांपैकी मी आहे. जाती, धर्मावर नव्हे, तर कोणत्या हिंदुवर अन्याय झाला, तरी ओवैसी बोलणार आहे. दलितवर झाला, तर बोलत होतो, बोलत राहणार. अन्याय हा अन्यायच असतो. अन्याय फक्त मुस्लिमांवर झाला म्हणून अन्याय नाही, कोणत्याही मुनष्यावर अन्याय झाला, तर तो अन्यायच आहे.’

खा. ओवैसींकडून आमदार पठाण लक्ष्य; ‘त्या’ वेळी काँग्रेस नेते पळाले

खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, ‘त्यांना वापस पाठवण्याची तयारी करीत आहे. मैदानमध्ये बसलो तर कठीण होईल. काँग्रेसचे कोणते पहेलवाल आहेत? २०२३ मध्ये दंगल झाले, तर काँग्रेसचे सर्व पहेलवाल पळून गेले होते. त्यावेळी काँग्रेसचे नेते कुठेच दिसून आले नाही. आता तेच काँग्रेसचे नेते मतांची भिक मागत फिरत आहेत. त्यावेळी आमच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी भेटी देऊन संकटातील नागरिकांना दिलासा दिला होता.’

खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेसाठी मोठी गर्दी उसळली होती.