scorecardresearch

Premium

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेर, ‘महात्मा गांधी म्हणत गावाकडे चला अन् आता…’

ग्रामीण भागातील मुलभूत समस्यांमुळे देशातील ३० टक्के लोकसंख्येचे शहराकडे स्थलांतर झाले आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वपक्षीय सरकारला घरचा आहेर दिला.

nitin gadkari criticize central government, nitin gadkari says low facilities in villages
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेर, ‘महात्मा गांधी म्हणत गावाकडे चला अन् आता…’ (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

अकोला : कृषी क्षेत्रातील समस्या देशापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. महात्मा गांधी गावाकडे चला असे म्हणत होते. मात्र, आता ग्रामीण भागातील मुलभूत समस्यांमुळे देशातील ३० टक्के लोकसंख्येचे शहराकडे स्थलांतर झाले आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वपक्षीय सरकारला घरचा आहेर दिला. पुढील ५० वर्षांचा विचार करून कृषी धोरण ठरविण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमाला आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार हरिश पिंपळे, आमदार अमोल मिटकरी, आमदार विप्लव बाजोरिया, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्यासह कार्यकारी परिषद सदस्य उपस्थित होते. नितीन गडकरींच्या हस्ते शिवार फेरीचे उद्घाटन करण्यात आले.

हेही वाचा : अनंत चतुर्दशीला चक्क नारळातून निघाले गणपती, भक्ताच्या घरी दाखवला चमत्कार

पुढे बोलतांना नितीन गडकरी म्हणाले, गावाकडे रस्ते नाहीत. शिक्षण, रोजगार व आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. शेतकऱ्यांकडे सिंचन सुविधा देखील नसते. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकसंख्या झपाट्याने शहरी भागाकडे वळत आहे. शेतीच्या उत्पादनाला योग्य किंमत मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत येतात. कृषी उत्पादनाला चांगला भाव मिळण्याचा संबंध हा मागणी व पुरवठ्यावर असतो. कृषी तज्ज्ञ स्वामिनाथन यांनी दरवर्षी कृषी उत्पादनाचा हमीभाव बदलावा, असा सल्ला दिला होता. त्यानुसार केंद्र सरकारने तो निर्णय घेतला. मात्र, आता बाजार किंमत व हमीभावात मोठा फरक दिसून येतो. त्याचा भार सरकारवर येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्पादनाची उपलब्धता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची गरज आहे.

हेही वाचा : गोडसेचे उदात्तीकरण करणाऱ्या सदावर्तेला बेड्या ठोका….काँग्रेसचा संताप

विदर्भातील कापसाची आता बांगलादेशात थेट निर्यात होणार आहे. त्यामुळे विदर्भाच्या कापसाला चांगला भाव मिळेल. याचा फायदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होईल. सर्व गोष्टींचा विचार करून धोरण ठरवावे लागणार आहे. एकरी उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. राजस्थानमध्ये खारपाणपट्ट्यात तळे तयार करून झिंग्याची शेती करून एकरी ३० लाखाचे उत्पन्न घेतले जाते. अमेरिकेतील कंपनीने त्याठिकाणी मोठी गुंतवणूक केली. तोच प्रयोग आता पश्चिम विदर्भातील खारपाणपट्ट्यात करणार आहे, असे गडकरी म्हणाले.

हेही वाचा : यवतमाळात नेमके काय बोलले अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते…?

अध्यक्षीय भाषणात धनंजय मुंडे यांनी नवतरुण शेतकऱ्यांनी व्यवसाय म्हणून शेती स्वीकारण्याचे आवाहन केले. नैसर्गिक संकटाला तोंड देत शेतकरी उभा राहतो. शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणण्यासाठी उत्पादन शुल्कावर ५० टक्के उत्पन्न मिळणे गरजेचे आहे. बदललेल्या वातावरणानुसार पीक पद्धतीमध्ये बदल झाला पाहिजे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होणे आवश्यक असून त्यासाठी कृषी विद्यापीठाने खर्चात बचत करण्याचे प्रात्यक्षिक करावे, असे धनंतय मुंडे म्हणाले. प्रास्ताविकात कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी विद्यापीठाची माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ. किशोर बिडवे यांनी, तर आभार विस्तार शिक्षण संचालक डॉ.उंदिरवाडे यांनी केले. दरम्यान, शेवार फेरीच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. २० एकर क्षेत्रावर एकाच ठिकाणी प्रत्येकी एक गुंठा क्षेत्रावर विविध पीकांची एकूण २२५ थेट प्रात्यक्षिकांचे अवलोकन शेतकऱ्यांना करता येत आहे.

हेही वाचा : “हे पाळलेल्या कुत्र्याचे दुकान नाही”, ॲड. गुणरत्न सदावर्तेंची जीभ घसरली…

कृषीमध्ये व्यापक फेरबदलांची गरज

शेतकरी आता अन्नदातासोबतच ऊर्जादाता झाला पाहिजे. इथेनॉल, हायड्रोजन निर्मितीकडे शेतकऱ्यांनी वळावे. वाहनांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे. विमानामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी तयार केलेले ५ टक्के इंधन चालेल. कृषी विद्यापीठाचे देखील अर्थशास्त्र बदलले पाहिजे. तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्राचा जीडीपी २४ टक्क्यांपर्यंत वाढवा. कृषी क्षेत्रात व्यापक फेरबदल करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In akola central minister nitin gadkari says 30 percent migration from villages to cities due to low facilities in villages ppd 88 css

First published on: 29-09-2023 at 19:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×