अकोला: जिल्ह्यात तुटवड्यासोबतच बोगस बियाण्याचे संकट निर्माण झाले आहे. कृषी निविष्ठांच्या विक्रीत कुठेही गैरव्यवहार आढळून आल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिल्यानंतर भरारी पथकांकडून तपासण्यांना वेग देण्यात आला आहे. कृषी विभागाच्या पथकाने अकोट तालुक्यातील उमरा येथे टाकलेल्या छाप्यात बोगस बियाणे जप्त केले.

या पथकाने केलेल्या कारवाईत दोषी आढळलेल्या दोन विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अकोट तालुक्यातील उमरा येथील निर्मल  दिलीपसिंग  तोमर (ठाकूर ) यांच्या  शेतातील  मोडकळीस आलेल्या घरात बोगस बियाणे असल्याबाबत गुप्त माहिती जिल्हास्तरीय भरारी पथकाला मिळाली.त्यानुसार याठिकाणी मोहीम अधिकारी महेंद्र साल्के, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सतिश दांडगे, कृषी अधिकारी भरत  चव्हाण व  अकोट  ग्रामीण  पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. त्यात बोगस कापूस बियाण्याची ७५ हजार २०० रुपयाची एकूण ४७ पाकिटे जप्त करण्यात आली. निर्मल तोमर (ठाकूर ) रा.उमरा  ता.अकोट यांच्या विरुद्ध अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>“यवतमाळ-वाशीम लोकसभेच्या मतमोजणीला स्थगिती द्या”, उच्च न्यायालयात याचिका; आक्षेप काय? जाणून घ्या…

दरम्यान, शेतकऱ्यांनी कपाशीच्या विशिष्ट वाणाचा आग्रह न धरता बाजारात उपलब्ध त्याच दर्जाच्या इतर पर्यायी वाणांची निवड करण्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे. खरीप हंगामासाठी कपाशीच्या एकाच कंपनीच्या वाणाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे कंपनीचे बीजोत्पादन कमी झाल्याने पुरवठ्यावर मर्यादा असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

त्याच दर्जाचे इतर समतुल्य वाणही बाजारात उपलब्ध असून त्यांची निवड करण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्यासह कृषी शास्त्रज्ञांनी केले. ठराविक वाणाऐवजी त्याच दर्जाचे व चांगले उत्पादन मिळवून देणारे अनेक वाण बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे समतुल्य वाण घेऊन कपाशीची लागवड करावी, असा सल्ला कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एन. व्ही. कायंदे यांनी दिला.

हेही वाचा >>>एका लाखाच्या मोबदल्यात चार लाख! फेसबुकवर जाहिरात पाहिली अन् चप्पल विक्रेता…

साठेबाजी रोखण्यासाठी भरारी पथके

कपाशीच्या विशिष्ट बियाण्याची मागणी व पुरवठ्यातील तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई व साठेबाजीला आळा घालण्यासाठी आता तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथके निर्माण करण्यात आली आहेत. या पथकांनी जिल्ह्यात विक्री केंद्रांची काटेकोर तपासणी करून कुठेही जादा दराने विक्री व साठवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. कुठेही अनियमितता आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.

कृषी विभागातर्फे खरीप निविष्ठांच्या संनियंत्रणासाठी यापूर्वीच पथके स्थापन केली आहेत. कपाशी बियाण्याच्या ठराविक वाणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आता तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पथके गठित करण्यात आली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याचा आदेश निर्गमित केला. या पथकांद्वारे कृषी निविष्ठांच्या विक्रीवर काटेकोर नजर ठेवण्यात येणार आहे.