अकोला : जिल्ह्यातील काळेगाव येथे कुलरमधून विजेचा जोरदार धक्का बसल्याने दोन चिमुकल्या मुलींचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. या प्रकारच्या वारंवार घडत असलेल्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जिल्ह्यातील काळेगाव येथे उन्हाळ्याची सुट्टी असल्याने दोन मुली आपल्या मामाच्या घरी आल्या होत्या. रविवारी दुपारी त्या घरात खेळत होत्या. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला तरी घरात कुलर सुरू होता. या कुलरला त्या दोन चिमुकल्या मुलींचा नकळत स्पर्श झाला. या कुलरमध्ये विजेचा प्रवाह होता. कुलरमधून त्या दोन मुलींना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामध्ये दोन्ही चिमुकल्या मुलींचा घटनास्थळीच मृत्यू झाला. काही वेळानंतर ही घटना समोर आली. इशाली प्रवीण ढोले आणि प्रियांशी सोपान मेतकर असे त्या मुलींची नावे आहेत. घटनेचा पंचनामा करण्यात आला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : सावधान ! हिंगोलीहून वाशीमकडे जाताना ‘ही’ पाटी वाचा अन्यथा…

जिल्ह्यात आतापर्यंत पाच घटना

उन्हाळ्यामध्ये वाढत्या तापमानात घरात थंडावा राहण्यासाठी कुलरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, आता थंडावा देणारा कुलरच सर्वसामान्यांच्या जीवावर उठला आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यात आतापर्यंत कुलरमधून विजेचा धक्का लागल्याने मृत्यू होण्याच्या जिल्ह्यात पाच घटना घडल्या आहेत. महावितरणकडून कुलरचा सुरक्षित व काळजीपूर्वक वापर करण्याचे वारंवर आवाहन करण्यात आले. त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनेवरून स्पष्ट होते.

हेही वाचा : खा. अनिल बोंडे म्हणतात, “विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची मस्ती…”

अशी घ्यावी काळजी

कुलरचा वापर ‘थ्री पीन प्लग’ वरच करावा, अर्थिंग योग्य असल्याची वारंवार तपासणी करावी, कुलरचा वीज प्रवाह बंद करून ‘प्लग’ काढल्यावरच त्यात पाणी भरावे, कुलरच्या आतील वीज तार पाण्यात बुडाली नसल्याची खात्री करून घ्यावी, ओल्या हाताने कुलरला स्पर्श करणे टाळावे, कुलरची वायर सदैव तपासून बघावी, फायबर बाह्यभाग असलेल्या व चांगल्या प्रतिच्या कुलरचा वापर करावा, घरातील मुले कुलरच्या सानिध्यात येणार नाही याची खबरदारी घेऊनच कुलर ठेवण्यात यावा, ओल्या हाताने किंवा ओल्या जमिनीवर उभे राहून टिल्लू पंप सुरू करू नये, पंप पाण्यात बुडला नसल्याची खात्री करून घ्यावी तसेच पंपाला वीज पुरवठा करणारी वायर पाण्यात बुडलेली नसावी, याचे ‘अर्थिंग’ योग्य असल्याचे तपासून घ्यावे, पंपातून नळ वाहिनीत वीज प्रवाहित होणार नसल्याची काळजी घ्यावी आदींसह विविध सूचना महावितरणच्यावतीने करण्यात आल्या आहेत.