अकोला : शहरामध्ये भरपावसाळ्यात महापालिकेने पाणीकपात केली आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान धरणातील पाणी पातळीत घट झाली. त्यामुळे शहरात आता सहाऐवजी सात दिवसाआड पाणीपुरवठा होईल. ऐन पावसाळ्यात अकोलेकरांवर पाणी संकट कोसळले आहे.
पावसाळ्याच्या पहिल्या जून महिन्याचे पंधरा दिवस उलटून गेले तरी जिल्ह्यात दमदार पावसाचे आगमन झाले नाही. दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढत आहे. तापमान चाळीशी पार गेले. पावसाळ्यामध्ये अकोलेकर गर्मीने त्रस्त आहेत. त्यातच आता पाणी कपातीचे नवे संकट निर्माण झाले. अकोला महानगरपालिका पाणी पुरवठा योजनेसाठी मुख्य जलस्रोत काटेपूर्णा प्रकल्प (महान) असून आज १६ जून रोजी प्रकल्पामध्ये ११.९१ द.ल.घ.मी. जलसाठा शिल्लक आहे. वाढत्या तापमानामुळे धरणातील पाण्याचे बाष्मीभवन होत आहे. धरणातील पाणी साठ्यामध्ये झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे सहा दिवसाआड होणारा पाणी पुरवठा आता सातव्या दिवशी करण्यात येणार आहे.
६५ एमएलडी प्रकल्पावरील महाजनी जलकुंभ, मोठी उमरी, गुडधी जलकुंभ, नेहरु पार्क जलकुंभ, तोष्णीवाल जलकुंभ, आदर्श कॉलनी, जलकुंभ, केशव नगर जलकुंभ, रेल्वेस्थानक जलकुंभ, गंगा नगर जलकुंभ, अकोट फैल जलकुंभ, जोगळेकर प्लॉट जलकुंभ, लोकमान्य नगर जलकुंभ तसेच २५ एमएलडीवरुन होणारा पाणी पुरवठा शिवनगर, आश्रय नगर व बस स्टॅन्ड मागील जलकुंभावरुन, शिवणी जलकुंभ, शिवर जलकुंभ, शिवापुर जलकुंभवरुन होणारा पाणी पुरवठा सातव्या दिवशी करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी पाण्याची पुरेशी साठवणूक करुन पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत साठा कमीच
अकोला जिल्ह्यातील धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमीच जलसाठा आहे. काटेपूर्णा धरणामध्ये सध्या ११.९२ टक्के जलसाठा असून आजच्या दिवशी गेल्या वर्षी १३.८० टक्के साठा होता. वान धरणामध्ये सध्या ३०.११ टक्के साठा असून गेल्या वर्षी तो किंचित कमी २९.४९ टक्के होता. दरम्यान, पश्चिम विदर्भातील सिंचन प्रकल्पांमधील जलसाठ्यात किंचित वाढ आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अमरावती विभागातील सर्व प्रकारच्या प्रकल्पांमध्ये जलसाठ्यात २.४७ टक्क्यांनी जलसाठा जास्त आहे. गत वर्षी १६ जून रोजी अमरावती विभागातील प्रकल्पांमध्ये ३६.७९ टक्के जलसाठा होता. यावर्षी मात्र त्यात थोडी वाढ होऊन सध्या ३९.२६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. अमरावती विभागात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.