अमरावती : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मला आई बहिणीवरुन शिवीगाळ केली, असा आरोप भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केल्यानंतर शिव्या देण्याचा विषय राज्यात चर्चेत आला. भारतीय संविधानाच्या तरतुदींचे उल्लंघन आणि माता-भगिनी, स्त्रीत्वाचा अवमान करणाऱ्या शिव्यांच्या उच्चाटनासाठी राज्य सरकारने पाऊले उचलावीत, अशी मागणी नव्यानेच गठीत झालेल्या शिव्यामुक्त समाज अभियान समितीने केली आहे. येथील श्रमिक पत्रकार भवनात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. डॉ. अंबादास मोहिते यांनी समितीच्या मागण्यांविषयी माहिती दिली. मोहिते म्हणाले, एकीकडे मातृत्व दिन, रक्षाबंधन, भाऊबीज, महिला दिन साजरा केला जातो तर दुसरीकडे आई आणि बहिणींशी निगडीत स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या अपशब्दांचा व अश्लाघ्य शिव्यांचा वापर भांडणाच्या वेळी तर सोडा इतर वेळी सुद्धा आजकाल सर्व धर्मातील व्यक्तींकडून सर्रासपणे केला जातो ही अत्यंत दुर्दैवाची व सामाजिक नैतिक मूल्यांना पायदळी तुडविणारी बाब आहे. हेही वाचा : ‘लाडकी बहीण’ अडचणीत, सेतू केंद्र चालकांचा असहकार…काय आहेत कारणे? मोहिते म्हणाले, ज्या व्यक्तीचा अपमान करायचा आहे त्याच्या आई किंवा बहिणीबद्दल वाईट शब्द वापरले जातात. त्यामुळे त्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा अवमान होतो आणि त्या व्यक्तीमध्ये खजीलपणाची व संतापाची भावना निर्माण होते. त्याची परिणीती शिव्या देणाऱ्या व्यक्तीच्या हत्येत झाल्याची सुद्धा अनेक उदाहरणे आहेत. संविधानाच्या तरतुदीच्या सन्मानासाठी, लिंगाधारित समानतेसाठी व संस्कृतीच्या संरक्षणासाठी आता या अपशब्दांना, अशा शिव्यांना हद्दपार करावे लागेल व त्याकरिता महाराष्ट्रा सारख्या पुरोगामी राज्याने पुढाकार घेण्याची नितांत गरज आहे. या संदर्भात महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स (मास्वे) या संघटनेतर्फे शासनाला यापूर्वी निवेदन देण्यात आलेले होते. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ वुमेन स्टडीज सेंटर व 'मास्वे' द्वारा नुकत्याच आयोजित सहविचार सभेत शिव्यामुक्त समाज अभियान समिती गठीत करण्यात आली असून समिती तर्फ शिव्यामुक्त समाज निर्मिती करिता शासनाकडे विशेष कायदा व इतर उपाय योजना करण्याकरिता पाठपुरावा करण्याचे आणि समाजात विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्याचे ठरले आहे, असे डॉ. मोहिते यांनी सांगितले. हेही वाचा : बुलढाणा : खामगावात अतिवृष्टीचे तांडव; आवार मध्ये ढगफुटी सदृश पाऊस, पुराने वेढलेल्या नऊ व्यक्ती… स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या अपशब्दांच्या, शिव्यांच्या वापरास आळा घालण्याकरिता कठोर असा विशेष कायदा करण्यात यावा, अध्यादेश जारी करण्यात यावा. सार्वजनिक ठिकाणी अश्लाघ्य शिव्यांच्या वापरावर तातडीने बंदी घालण्यात यावी, शाळा-महाविद्यालयांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवित असतांना जबाबदार नागरिक, नागरिकांची कर्तव्ये, इतरांचा आदर, लिंगभाव समानता, माता-भगिनींचा सन्मान आदी बाबींचा अभ्यासक्रमात समावेश व्हावा, ओटीटी प्लटफॉर्म व इतर प्रसार माध्यमांवर प्रदर्शित होणाऱ्या वेब सेरीज, चित्रपटांमध्ये अशा शिव्यांचा वापर केल्यास त्याचे लेखक, निर्माते, निर्देशक व कलाकारांवर कडक कारवाई करण्यात यावी, विधानसभा, विधान परिषद, स्थानिक संस्थांच्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या अपशब्दांचा, अश्लाघ्य शिव्यांचा निवडणुकीत व त्यानंतर सुद्धा वापर करणार नाही, असे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात यावे, या मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत. पत्रकार परिषदेला प्रा. डॉ अंबादास मोहिते, रझिया सुलताना, पंडित पंडागळे, शीतल मेटकर, संजय खडसे आदी उपस्थित होते.