अमरावती : ‘अध्यात्म व विज्ञानाची सांगड घालून अखिल विश्व सुखी समृद्ध करण्याचा ‘ग्रामगीता’रुपी महामंत्र देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना देशाच्या कानाकोपऱ्यातून गुरुकुंज मोझरी येथे आलेल्या लाखो भाविकांनी शनिवारी दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी मौन श्रद्धांजली अर्पण केली. पूजापाठाचे कुठलेही अवडंबर न माजवता केवळ मौन पाळून वाहण्यात आलेल्या या श्रद्धांजलीमुळे गुरुकुंजात नीरव शांतता पसरली होती. राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची चाकेही यावेळी थांबली होती. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मौन श्रद्धांजलीपुर्वी दुपारी साडे तीन वाजता ‘गुरूदेव हमारा प्यारा.. है जीवन का उजियारा..’ या गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली.

५७ वर्षांची अखंड परंपरा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण अश्विन वद्य पंचमी ११ ऑक्टोबर १९६८ ला दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी झाले होते. तेव्हापासून दरवर्षी अविरत गुरुकुंजात हा श्रद्धांजली सोहळा आयोजित करण्यात येतो.

‘मज वेडची गुरुकुंजाचे, आवडतो मज कण कण तिथला’ या तुकडोजी महाराजांच्या संदेशानुसार, राज्याच्या विविध भागांतून पालख्या, दिंड्या आणि पताकांसह लाखो भाविक ‘श्रीगुरुदेव की जय’चा जयघोष करत खंजिरी भजन व टाळ-मृदंगाच्या गजरात आश्रमात दाखल झाले. गुरुकुंज आश्रम हे सर्वधर्म समभावाचे प्रतीक ठरले. मौन श्रद्धांजलीच्या मुख्य कार्यक्रमाला साडेतीन वाजता ‘गुरुदेव हमारा प्यारा’ या अर्चना गीताने सुरुवात झाली. ‘लढ जायेंगे बढ जायेंगे हम हिम्मत के साथ’, ‘तुझे पाय साक्ष आहे नारायण जरा भेटीविन शांती नाही’, यांसारख्या भजनांनी राष्ट्रसंतांच्या कार्याची महती शब्द व सुरांच्या माध्यमातून लाखो जनसमुदायापर्यंत पोहोचवण्यात आली.

सुमारे दोन तास लाखो भाविक ध्यानस्थ बसून राष्ट्रसंतांच्या विश्वात्मक कार्याचा अनुभव घेत होते. महाद्वारावरील विशाल घंटेचा निनाद होताच, नेमक्या ४ वाजून ५८ मिनिटांनी लाखो गुरुदेव भक्तांनी राष्ट्रसंतांच्या महासमाधी स्थळाच्या दिशेने हात जोडून अत्यंत शिस्तबद्धरित्या श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर सर्व धर्मांची प्रार्थना करण्यात आली.

खासदार अनिल बोंडे, खासदार बळवंत वानखडे, माजी खासदार नवनीत राणा, आमदार राजेश वानखडे, माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे, राजेश्वर माऊली, श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या संचालक मंडळ अध्यक्षा पुष्पा बोंडे, संचालक कीर्तीकुमार भांगडीया, संचालक सुरेंद्र भुयार, सर्वाधिकारी लक्ष्मण गमे, उपसर्वाधिकारी दामोदर पाटील, प्रचार प्रमुख प्रकाश वाघ, सरचिटणीस जनार्दन बोथे, तसेच राज्यातील आजीवन व जीवन शाखा प्रमुख आणि प्रचारक, कार्यकर्ते उपस्थित होते. या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे नियोजन आध्यात्मिक विभाग प्रमुख डॉ. राजाराम बोथे यांनी केले.