अमरावती : आज ना उद्या ‘शकुंतला’ रेल्वे पुन्हा धावेल, या आशेतून जमलेल्या अचलपूरकरांनी नॅरोगेज ‘शकुंतला’ रेल्वेचा १११ वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. १११ दिव्यांची आरास सजवून महाआरती करीत अचलपूर ते मुर्तिजापूर हा रेल्वेमार्ग पुन्हा सुरू व्हावा, अशी प्रार्थना नागरिकांनी केली.

२०१८ पासून शकुंतला रेल्वे बचाव कृती समितीच्या वतीने शांततामय मार्गाने आंदोलन केले जात आहे. अचलपूर ते मुर्तिजापूर या नॅरोगेज रेल्वे मार्गावरील बंद पडलेली रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे. दरवर्षी या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी ‘शकुंतला’ रेल्वेचा वाढदिवस साजरा केला जातो. यंदा देखील या अनोख्या वाढदिवसाला अचलपूर येथील रेल्वे स्थानकावर नागरिकांनी गर्दी केली होती.

हे ही वाचा… करवसुलीच्या खासगीकरणाचा राज्यातील एकमेव प्रयोग फसला; अकोला महापालिकेपुढे आता…

यावेळी १११ दिवे पेटविण्यात आले. संत, महंतांच्या हस्ते श्री गणेश प्रतिमा आणि भारत मातेचे पूजन करण्यात आले. त्याआधी सकाळी ७ वाजेपासून अचलपूर येथील रेल्वे स्थानकाची स्वच्छता करण्यात आली. रेल्वे बचाव सत्याग्रह समितीचे राजेश पांडे, किरण गवई यांच्या मार्गदर्शनात युवकांनी स्वच्छता अभियान राबविले.

मुख्य कार्यक्रमाला आमदार प्रवीण तायडे, तहसीलदार संजय गरकल, मुख्याधिकारी धीरज कुमार गोहाड, दिनेश मोहोड प्राचार्य सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राचार्य दिनेश मोहोड, एसटी आगार व्यवस्थापक जीवन वानखडे, माजी वनअधिकारी एस.बी.बारखडे, कुंदन यादव, प्रवीण तोडगांवकर, संत राममोहन महाराज, आचार्य सुदर्शन, रुपेश ढेपे, विशाल काकड, योगेश खानजोडे, राजा धर्माधिकारी, शारदा उईके आदी उपस्थित होते.

हे ही वाचा… प्रेयसीसमोर कानशिलात लगावणे आईवडिलांच्या जीवावर बेतले !

आंदोलन तर सर्वच करतात पण प्रशासनला वेठीस धरून, नागरिकांची संपत्ती नष्ट न करता, कुठेही नागरिक व प्रशासनाला त्रास न देता, रेल्वे बचाव सत्याग्रह समिती शांततेच्या मार्गाने जे आंदोलन करत आहे, ही प्रेरणा सर्वांनी घेतली पाहिजे, असे तहसीलदार संजय गरकल म्हणाले.

ज्या भरघोस मतांनी आमदार म्हणून तुम्ही मला निवडून दिले, प्रेम दिले, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. शकुंतला रेल्वे ब्रॉडगेज करण्यासाठी मी प्रयत्नरत राहिल आणि वेळोवेळी पाठ पुरावा करेल. मी एक सत्याग्रही म्हणून नेहमी मदत करणार असल्याचे आमदार प्रवीण तायडे म्हणाले. जमात-ए-हिन्द महिला संघटनेच्या यास्मीन बानो, परवीन बानो यांनी देखील मनोगत व्यक्त केले. शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचे योगेश खानजोडे, गजेंद्र कोल्हे, राजा धर्माधिकारी, संजय डोंगरे, सुरेश प्रजापति, राजकुमार बरडिया, कमल केजरीवाल, राजेश अग्रवाल यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Story img Loader