अमरावती : मोर्शी येथील शिवाजीनगर भागातील एका घरात आई आणि मुलाचा मृतदेह लाकडी दिवाणाच्या कप्प्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. नीलिमा गणेश कापसे (४५) आणि आयुष गणेश कापसे (२२) अशी मृतांची नावे आहेत. नीलिमा कापसे यांचे पती गणेश यांचे यापुर्वीच निधन झाले आहे. नीलिमा आणि त्यांचा मुलगा हे दोघेच मोर्शी येथील शिवाजी नगर भागातील घरात वास्तव्याला होते. गेल्या चार-पाच दिवसांपासून मोबाइलवर संपर्काचा प्रयत्न करूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने नीलिमाचे वडील शुक्रवारी कोंढाळीहून मोर्शीला आले. घराचे दार उघडत नसल्याचे पाहून त्यांनी पोलीस ठाणे गाठले.
हेही वाचा : चंद्रपुरात उन्हाचा तडाखा! पावसाअभावी कापूस, सोयाबीन, धान करपण्याच्या मार्गावर
त्यांच्या माहितीवरून मोशींचे ठाणेदार श्रीराम लांबाडे व त्यांच्या चमूने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी कापसे यांच्या घराच्या परिसरात दुर्गंधी पसरलेली होती. पोलिसांनी घराचे दार उघडून पाहिले, तेव्हा त्यांना दिवाणाच्या कप्प्यामध्ये नीलिमा व आयुषचे कुजलेले मृतदेह आढळून आले. यावेळी परिसरातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. नीलिमा व आयुष यांच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नीलिमा या मजुरीचे काम करीत होत्या तर आयुष हा शिक्षण घेत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.