अमरावती : देशातील संसदीय लोकशाही धोक्‍यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वपक्षातील खासदारांमध्‍येही दहशत आहे. रशियात ज्‍या पद्धतीने राष्‍ट्राध्‍यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सत्‍तासूत्रे एकट्याच्‍या हाती घेतली आहेत, ती पाहताना आपल्‍या देशात नवीन पुतिन तयार होतो की काय, ही चिंता भेडसावू लागली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केली. काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्‍या प्रचारार्थ येथील संत ज्ञानेश्‍वर सांस्‍कृतिक सभागृहात आयोजित इंडिया आघाडीच्‍या मेळाव्‍यात ते बोलत होते. यावेळी माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे सरचिटणीस मुकूल वासनिक, आमदार यशोमती ठाकूर, माजी मंत्री अनिल देशमुख, डॉ. सुनील देशमुख आदी उपस्थित होते.

शरद पवार म्‍हणाले, देश हा संसदीय लोकशाही पद्धतीने चालावा, यासाठी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मोठे योगदान दिले. पण, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहरूंविषयी चुकीची माहिती देतात. दहा वर्षांची सत्‍ता हाती असताना आपण काय केले, ते सांगत नाहीत. अन्‍य लोकांवर टीका करण्‍यात ते वेळ घालवतात. व्‍यापक दृष्‍टीकोनाचा अभाव त्‍यांच्‍यात दिसतो. भाजपचे अनेक खासदार हे नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्‍यासाठी देशाचे संविधान बदलण्‍याची भाषा उघडपणे बोलत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलविण्‍याची ताकद कुणातही नाही. पण, राज्‍यघटना बदलली पाहिजे, अशी इच्‍छा बाळगणाऱ्या लोकांच्‍या हाती सत्‍ता आली तर, देशाची संसदीय लोकशाही अस्‍ताला जाईल, अशी भीती शरद पवार यांनी व्‍यक्‍त केली.

हेही वाचा : ‘अवकाळी’चे पुनरागमन, राज्यातील ‘या’ भागात आज पुन्हा बरसणार…

अमरावतीत २०१९ च्‍या निवडणुकीच्‍या वेळी आमच्‍याकडून मोठी चूक झाली. नवनीत राणा यांना मतदान करा, असे आवाहन आम्‍ही त्‍यावेळी केले होते. पण, पाच वर्षांत त्‍यांनी काय केले, हे लोकांसमोर आहे. गेल्‍या वेळी केलेली चूक दुरूस्‍त करण्‍यासाठी काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांना निवडून द्यावे लागणार आहे, असे पवार म्‍हणाले.

हेही वाचा : उदंड झाली वाहने अन् रस्त्यावर खड्डेच खड्डे! उपराजधानीतील सदर मंगळवारी बाजार उड्डाणपुलावर…

मुकूल वासनिक म्‍हणाले, नरेंद्र मोदी यांच्‍या स्‍वरूपात दहा वर्षांपुर्वी आपल्‍या देशाला नवीन नेता मिळाला, असे लोकांना वाटले. दहा वर्षांनंतर आता म्‍हणावे लागेल, की हा तर अभिनेता निघाला आणि त्‍यातल्‍या त्‍यात खलनायक निघाला. त्‍यांच्‍या शब्‍दांत द्वेष, तिरस्‍कार दिसून येतो. लोकांना भडकविण्‍याचे काम ते करतात, सर्वात मोठे आव्‍हान नरेंद्र मोदी यांच्‍या दहा वर्षांत राजकीय पक्ष संपविण्‍याचे प्रयत्‍न त्‍यांनी केले. पक्ष तोडले, घरे तोडली, अनेक नेत्‍यांना तुरूंगात डांबले, ही हुकूमशाही आहे. नरेंद्र मोदी यांचे सरकार आले, तर पुन्‍हा देशात निवडणुका होणार नाहीत.