अमरावती : आरोपी शिवचंद बनसोड याच्याविरूध्द २०१७ मध्ये पोस्को व बलात्काराचा गुन्हा दाखल होता. त्याला पुसद न्यायालयाने दोषी ठरवून १० वर्षे कारावास व ३५०० रुपये दंड ठोठावला. १२ सप्टेंबर २०१९ रोजी त्याला वाशीम कारागृहातून अमरावती कारागृहात आणण्यात आले. त्याला येथील कारागृहातील न्याय विभागात साफसफाईचे काम देण्यात आले होते. तो वरिष्ठ लिपिक बऱ्हाटे याला कामकाजात मदत देखील करत होता.

दरम्यान ८ ऑगस्ट रोजी व्हीसीदरम्यान कारागृह उपमहानिरिक्षकांना शिक्षाबंदी शिवचंद्र बनसोड याच्या प्रस्तावात शिक्षेच्या तुलनेत माफीचा कालावधी अधिक आढळून आला. त्यामुळे त्यांनी तातडीने तपासणीचे निर्देश दिले. कालच चौकशी करण्यात आली. त्यात फसवणुकीचा प्रकार उघड झाला.

हेही वाचा : धक्कादायक.. नागपूर विद्यापीठातील बनावट पदवीच्या जोरावर विदेशात नोकरी!

या प्रकरणी तुरूंगाधिकारी उमेश गुंडरे (४८) यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी कारागृहातील वरिष्ठ लिपिक सुहास बऱ्हाटे (४९) व शिक्षाबंदी शिवचंद प्राण बनसोड (२७, रा. मुडधी, ता. पुसद, यवतमाळ) या दोघांविरूध्द फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. कारागृह विभागाच्या पोलीस उपमहानिरिक्षकांनी येथील तुरूंगाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधला. त्यात ती बनवाबनवी उघड झाली.

येथील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या या कैद्याने चक्क कारागृहातूनच स्वत:च्या शिक्षा माफीच्या प्रस्तावाचे आदेशही तयार केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले असून या प्रकारामुळे कारागृह प्रशासन अवाक् झाले आहे. या प्रकरणात कारागृहातील एक लिपिकाचाही सहभाग असल्याने त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : अमरावती : एमआयडीसी परिसरातील बनावट दारूचा कारखाना पोलिसांनी केला उद्ध्वस्त

आरोपी शिवचंद्र बनसोड याने दोन कैद्यांच्या शिक्षा माफीच्या आदेशात फेरफार करून बऱ्हाटे यांच्या संगणकावर स्वत:च्या नावाचे बनावट माफीचे तीन आदेश तयार केले. बऱ्हाटे याने कुठलीही खातरजमा न करता बनसोडने दिलेल्या ९०, ९० व १५ अशा एकुण १९५ दिवस बनावट शिक्षा माफीच्या आदेशाची नोंद पुस्तकात घेतली. मूळ आदेशात बदल करून शिवचंद्रने बनावट आदेश तयार केले. बीए व एमए पूर्ण केले म्हणून प्रत्येकी ९० दिवस व योगशिक्षक पदविका पूर्ण केल्याने १५ दिवस शिक्षा माफीचा प्रस्ताव त्याने स्वत:च तयार केला.

बऱ्हाटे याने काहीच खात्री केली नाही. उलट आरोपी कैद्याला शिक्षा माफीचे दोन मुळ आदेश प्राप्त करून दिले. शिक्षा माफी मिळवून देत त्याला मदत केली. असा ठपका बऱ्हाटेवर ठेवण्यात आला आहे.