भंडारा : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा आज जिल्हा दौरा होता. त्यांच्या हस्ते भंडारा बायपासचा लोकार्पण सोहळा पार पडणार होता. दुपारी १२ वाजता उद्घाटनाची वेळ नियोजित असताना तब्बल दोन तास लोटूनही नितीन गडकरी पोहोचलेले नाही. आधीच रिक्त असलेल्या सभा स्थळीच्या खुर्च्या आणखीच रिकाम्या होत गेल्या. एवढेच नाही तर काही भाजप नेते आणि कार्यकर्तेही आता काढता पाय घ्यायला लागले….
२०२२ मध्ये मंजूर झालेल्या भंडारा बायपासचे आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रीतसर लोकार्पण होणार होते. मागील तीन वर्षांपासून निर्माण कार्य सुरू असलेल्या भंडारा बायपासचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. शिवाय दोन दिवसांपूर्वी या महामार्गाच्या सुरक्षा कडा वाहून गेल्यानंतर या कामाच्या निकृष्टतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. असे असताना आज या महामार्गाचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्याचे ठरले.
कार्यक्रमासाठी सभास्थळी रिकाम्या खुर्च्या बघूनच अनेक जण परत जाऊ लागले. त्यातच खुद्द गडकरी दोन तास उशिरा येत असल्याने अनेकांनी कंटाळून काढता पाय घेतला. पत्रकार आणि कार्यकर्त्यांसह अनेकाना ९ वाजताची वेळ देण्यात आली होती. त्यामुळे अनेक जण १० वाजता पासूनच बसून होते. कार्यक्रमाचे संचालक गडकरी ऑन द वे असल्याचे वारंवार सांगत होते. परंतु, अखेर सभा मंडपातून खुर्च्या रिकाम्या होण्यास सुरवात झालीच.