भंडारा : घरकुल लाभार्थ्यांच्या यादीत नाव नसताना एका व्यक्तीच्या नावाची बनावट रॉयल्टी काढण्याचे काम भंडारा तहसील कार्यालयात केले गेले. एवढेच नव्हे तर त्या व्यक्तीच्या नावावर घरकुलाच्या ५ ब्रास वाळूची उचल करून विक्रीही करण्यात आली. या प्रकरणाला महिना लोटून गेला असताना तहसील कार्यालयातील दोषी कर्मचारी आणि ट्रक चालकावर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तहसीलदारांच्या सुनावणीला ट्रक चालक अनुपस्थित राहतो तसेच वरठी ठाणेदारांनी बोलावल्यावरही तो येत नाही. असे असतानाही त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही हे विशेष.
मोहाडी तालुक्यातील वरठी येथील रहिवासी अश्विन शेंडे यांचे नाव भंडारा तालुक्यातील सोनोली गावच्या घरकुल यादीत असल्याचा बनाव भंडारा तहसील कार्यालयातून करण्यात आला. त्यानुसार अश्विन यांना ओटीपी मागून त्यांच्या नावे घरकुलची योजनेची ५ ब्रास वाळू उचलून ती परस्पर विक्री करण्यात आली. या प्रकरणात शेंडे यांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली. या प्रकरणात २६ जून रोजी तक्रारदार शेंडे यांच्यासह तहसील कार्यालयातील दोन कर्मचारी स्मिता शेंडे व नौसिया खान तसेच ट्रक चालक सुमित नारनवरे यांना तहसील कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. यावेळी ट्रक चालक सुमित नारनवरे मात्र आलाच नाही. त्याच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी तहसीलदार माकोडे यांना संपर्क केला असता ते प्रतिसाद देत नाहीत.
पंचायत समितीच्या यादीत नावच नाही…
घरकूल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची यादी पंचायत समितीतून तहसील कार्यालयाच्या सुपूर्द करण्यात येते. ही यादी देण्यास तहसीदारानी टाळाटाळ केल्यामुळे अश्विन शेंडे यांनी पंचायत समितीत अर्ज करून यादी मागवली. सोनोली गावच्या यादीत त्यांचे नावच नाही. त्यामुळे हा सर्व घोळ तहसील कार्यालयातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. रॉयल्टी पावती तयार करणारा तो कर्मचारी कोण, त्याच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ का केली जात आहे असा प्रश्न शेंडे यांनी उपस्थित केला आहे.
ठाणेदार म्हणतात इतर प्रकरणांचा भार….
९ जून रोजी वरठी पोलीस ठाण्यात ट्रक चालक सुमित नारनवरे याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. या बाबत ठाणेदार निलेश गिरी यांना विचारणा केली असता सुमित नारनवरे याला वारंवार बोलावूनही तो येत नाही आणि इतर महत्वाची प्रकरणं असल्यामुळे नारनवरे याला घरून उचलून आणता येत नाही, असे सांगितले
तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश…
जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी तहसीलदार, मंडळ अधिकारी तसेच ठाणेदार पवनी यांना स्वतः फोन करून ताबडतोब गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनाही पवनी पोलिसांना याबाबत सूचना दिल्या. तसेच तहसील कार्यालयातील कोणत्या कर्मचाऱ्याने घोळ केला याची त्वरित चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश तहसीलदार माकोडे यांना दिले. दोषींवर लवकरच कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी डॉ. कोलते यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.