भंडारा : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा आज जिल्हा दौरा असून त्यांच्या हस्ते भंडारा बायपासचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. हा शासकीय दौरा असला तरी भाजपच्या नेत्यांनी गडकरींच्या आगमनाची जय्यत तयारी चालवली आहे. मात्र त्याचवेळी भाजपच्या दोन नेत्यांमध्ये असलेली अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. लोकार्पण सोहळ्याच्या बॅनरवरील फोटो आणि पत्रिकेवरील नावावरून या दोन नेत्यांमधील दुफळी चर्चेचा विषय बनला आहे.
मागील तीन वर्षांपासून निर्माण कार्य सुरू असलेल्या भंडारा बायपासचे आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रीतसर लोकार्पण होणार आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणेनाच नव्हे तर भाजप नेतेही जोमाने कामाला लागले आहेत. कार्यक्रमापूर्वी जाहीर निमंत्रण पत्रिका आणि मंत्र्यांच्या आगमनाचे बॅनर लावणे ही रीतच आहे. त्यामुळे आजच्या लोकार्पणनिमित्त गडकरींचेही बॅनर भाजप नेत्यांनी लावले आणि त्यातूनच भाजपच्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आले.
नवनियुक्त भाजप जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे यांनी लावलेल्या बॅनरवर गडकरींसह सर्व नेत्यांचे फोटो आहेत. विशेष म्हणजे या भंडारा बायपासच्या कामाशी दुरान्वये संबंध नसलेले आमदार डॉ. परिणय फूके यांचाही बॅनरवर फोटो आहे. मात्र या बायपाससाठी ज्यांनी सातत्याने पाठपुरावा केला त्या माजी खासदार सुनील मेंढे यांचा फोटो बॅनरवर नाही. जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे यांनी जाणीवपूर्वक मेंढे यांना डावलून बॅनरवर त्यांचा फोटो लावला नसल्याचा आरोप काही भाजप नेत्यांनी केला आहे. तसेच जिल्हाध्यक्ष या नात्याने गोंडाणे यांचे हे वागणे योग्य नसल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे सुनील मेंढे त्यांच्या बॅनरवर जिल्हाध्यक्ष गोंडाणे यांचे फोटो लावण्याचे हेतुपरस्पर टाळले जात असल्याचेही गोंडाने यांच्या काही समर्थकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे या एका कार्यक्रमासाठी दोघांनी वेगवेगळी निमंत्रण पत्रिका प्रकाशित केली आहे. माजी खासदार सुनील यांनी छापलेल्या पत्रिकेत विनीतमध्ये मेंढे यांच्याच नावाचा उल्लेख आहे तर जिल्हाध्यक्ष गोंडाणे यांनी छापलेल्या कार्यक्रम पत्रिकेत विनीत भारतीय जनता पक्ष असे लिहिले आहे.
विधान सभा निवडणुकीच्या काळातही या दोघांमध्ये अंतर्गत वाद होतेच. भंडाऱ्यात सुनील मेंढे आणि परिणय फुके असे दोन गट पडलेले असताना आता जिल्हाध्यक्ष आणि माजी खासदार यांच्यातील वादाने भाजपामध्ये फूट वाढणार का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. गडकरी यांच्या दौऱ्यापूर्वीच भाजपचे नवे आणि तरुण जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे तसेच भाजपचे नेते व माजी खासदार सुनील मेंढे यांच्यातील या वादाने भाजपमध्ये दोन गट पुन्हा प्रकर्षाने जाणवू लागले आहेत.
गडकरींचे नियोजित कार्यक्रम…
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे शनिवारी सकाळी ११.४० वाजता मौदा येथे आगमन होणार आहे. त्यानंतर ते नागपूर- भंडारा रोडवरील मौदा टी-पॉईंट येथे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी १२ वाजता भंडारा नवीन वैनगंगा पुलाचे उद्घाटन आणि बायपासचे निरीक्षण व दुपारी १ वाजता महर्षी विद्या मंदिर मैदान,अशोकनगर,भंडारा येथील कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी १.१० वाजता राष्ट्रीय महामार्गाच्या नवीन प्रकल्पाचे भूमिपूजन त्यानंतर दुपारी २.१५ वाजता भंडारा येथून नागपूरकडे प्रयाण करतील.