भंडारा : जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून अनेक मार्ग बंद पडले आहेत. अनेक ठिकाणी घरांमध्ये आणि शेतांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. काल रात्रीपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. वैनगंगेची पातळी वाढली आहे. तसेच नदी व नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे नदीचे पाणी, धरणातील विसर्ग व तलावातील पाण्याची पातळी वाढली आहे. हेही वाचा : नागपूर: पावसाच्या तडाख्यात विजेचा लपंडाव; बेसा परिसरातील उपकेंद्रात शिरले पाणी भंडारा शहरातील खोलगट वस्तीसह घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. लाखांदूर, पालांदूर यासह अन्य भागातून या तक्रारी येत आहेत. रस्ते उंच व घरे खोलगट भागात गेल्याने ही समस्या अनेक ठिकाणी उद्भवली असल्याचे नागरिक आता बोलू लागले आहे. यामुळे मध्यरात्री अनेक कुटुंबांची तारांबळ उडाली. अनेकांचे प्रचंड नुकसान झाले. मार्ग बंद… राष्ट्रीय महामार्ग ६ वर साईनाथ नगर येथे रस्त्यावरून जवळपास दोन फूट पाणी वाहत आहे. भंडारा शहरातून कारधा येथील साई मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर जवळपास पाच फूट पाणी साचल्याने मार्ग बंद पडला आहे. पवनी तालुक्यातील आसगांव ते ढोलसर हा मार्गही बंद पडला आहे. तसेच लाखांदूर ते पिंपळगाव ( कोहळी) मार्गावरील पुलावर पाणी आल्याने हा मार्ग सुद्धा बंद आहे. चकारा ते अड्याळ मार्गावर २ फुट पाणी साचले आहे. लाखनी ते अड्याळ, कोंढा ते बेलांटी मार्ग, कोंढा ते सोमनाळा विरली ते सोनेगाव मार्गावर २ फूट तर डोंगरगाव ते गोळेवाडी मार्गावर ४ फूट पाणी साचले आहे. हेही वाचा : वर्धा जिल्ह्यात पर्जन्यकोप! वाहतूक ठप्प, पिके पाण्यात… लाखांदूर तालुक्यात जनजीवन विस्कळित… लाखांदूर तालुक्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांच्या घरात शिरले पाणी आहे. मार्गही बंद झाले आहेत. लाखांदूर शहरात अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने जीवनापायोगी साहित्याची नासधूस झाली आहे. अनेक मार्ग बंद झाल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. तालुक्यातील हजाररो हेक्टर क्षेत्रातील धान पीक पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. लाखांदूर तालुक्यात शुक्रवारी रात्री साडेदहा वाजतापासून मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्रभर बरसलेल्या मुसळधार पावसामुळे लाखांदूर वरून मोरगाव अर्जुनी कडे जाणाऱ्या पिंपळगाव कोहली नाल्यावरील पुलावरून पुराचे पाणी वाहू लागल्याने मार्ग बंद झाला आहे तर कन्हाळगाव ते पूयार मार्गावरील नाल्यावरील पुलावरून पुराचे पाणी वाहू लागले असून मार्ग बंद झाला आहे लाखांदूर शहरातील सर्वच प्रभागातील अवस्था पावसामुळे बिकट झाली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अँड. वसंत एनचीलवार यांच्या घरापुढे पुराची स्थिती निर्माण झाली तर येथील मां ट्रेडर्सचे मोहन नगवानी यांच्या किराणा दुकानात पावसाचे पाणी शिरले. हेही वाचा :“गडचिरोलीच्या पालकमंत्र्यांना केवळ उद्योगासाठी वेळ, जनता वाऱ्यावर ?”, काँग्रेसची टीका नगर पंचायत लाखांदूरच्या माजी सभापती वनिता मिसार यांच्या घरात दोन ते अडीच फूट पाणी साचले आहे. प्रभाग सहा,आठ व नऊ मधील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने अनेकांना रात्र जागून काढावी लागली. लाखांदूर नगर पंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष शहरातील जनजीवन विस्कळीत होण्याला कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तर राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंटीकारण करताना नियमबाह्य कामे केल्याने पाणी जाण्यास मार्ग नसल्यामुळे दरवर्षी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. लाखांदूर तालुक्यातील बहुतांश गावात पावसाचे पाणी शिरले असल्याची माहिती आहे. नदी नाले धोक्याची पातळी ओलांडत असल्याने पुराची स्थिती निर्माण झाली आहे. आज सकाळपासून पुन्हा पावसाने जोर धरला असून महसूल तसेच पोलीस विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.