बुलढाणा: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘वोट जिहाद’चा फटका महायुतीला बसला. एका विशिष्ट समाजाने केवळ हिंदुत्वाचा पराभव करण्यासाठी संघटित मतदान केले. या तुलनेत मतदान करणारा हिंदू समाज मात्र जातीपातीमध्ये विभागला गेला. यामुळे लोकसभेच्या लढतीत राज्यात महायुतीला कमी जागा मिळाल्या. किंबहुना अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र यापासून धडा घेत विधानसभा निवडणुकीत हिंदू समाजाने देखील आपली संघटित शक्ती दाखवून दिली. त्यामुळे हिंदुहितासाठी संघटित मतदानाचा संकल्प करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांनी केले.

चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथे विकसित भारत संकल्प सभा पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना महाले यांनी वरील शब्दात लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील यशापयशाची कारण मिमांसा केली. यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य उल्हास देशपांडे, भाजपचे जिल्हा सचिव तथा संकल्प से सिद्धी अभियानाचे संयोजक चंद्रकांत बर्दे, मंडळ अध्यक्ष शिवाजी वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त हे होते.

यावेळी आमदार महाले यांनी सांगितले की, २०१४ नंतर देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आले. गेल्या ११ वर्षांत लाखो कोटींची विकासकामे देशात झाली. सब का साथ सबका विकास यानुसार केंद्र सरकार काम करत आहे. विकसित भारताचा संकल्प मोदी यांनी केला आहे. त्यामुळे देशाला विकसित बनविण्यासाठी हिंदू हितासाठी मतदान करण्याचे आवाहन आमदार त्यांनी केले.

जगात भारताचा डंका : शिंदे

यावेळी माजी आमदार विजयराज शिंदे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात देशाने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. भारताकडे वाकडा डोळा केल्यास काय होते हे पाकिस्तानसह संपूर्ण जगाला आता माहीत झाले आहे. जगातली तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताची वाटचाल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी मोदी यांची अकरा वर्षांची कारकीर्द देशाचा गौरव वाढवणारी असल्याचे सांगितले. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत हिंदू समाजाने संघटित होऊन मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटे यांचेही भाषण झाले. संचालन ज्ञानेश्वर परिहार यांनी केले. संकल्प सभेच्या प्रारंभी आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या आणि राम मंदिर आंदोलनाच्या कारसेवेत सहभाग घेतलेल्या कार्यकर्त्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.