बुलढाणा : दोन निरागस जीवांच्या अकाली मृत्यूने सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील निमगाव वायाळ येथे सातव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. समृद्धी गैबीनाथ वायाळ असे मृत बालिकेचे नाव आहे.
समृद्धी शाळेची तयारी करत होती. यावेळी नळ आल्याने घरासमोरील नळावर पाणी भरताना ती अचानक विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आली, नळातच वीज प्रवाह (करंट) उतरल्याने तिला तीव्र धक्का बसला. त्यामुळे ती जागीच गतप्राण होऊन कोसळली. आजोबा व शेजाऱ्यांनी तत्काळ तिला किनगाव राजा येथील खाजगी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती तिला मृत घोषित केले. समृद्धी ही हिवरखेड पूर्णा येथील विजय मखमले विद्यालयात सातवीत शिकत होती. अभ्यासात हुशार, आज्ञाधारक, सर्वांची लाडकी अशी तिची ओळख होती. शाळेतील उपक्रम, खेळांमध्ये ती नेहमी पुढे असायची. तिच्या अचानक जाण्याने शिक्षक, तसेच संपूर्ण गाव सुन्न झाले आहे. या घटनेने गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आहेत.
हौदात पडून मृत्यू
दुसरीकडे देऊळगाव राजा शहरातील त्र्यंबक नगर भागात एका चिमुकलीचा पाण्याच्या हौदात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत चिमुकलीचे नाव कुमारी ईश्वरी अंकुश हरणे (वय २) असे आहे. काल संध्याकाळी उशिरा ती घराबाहेर खेळत असताना अचानक दिसेनाशी झाली. कुटुंबीयांनी तातडीने तिचा परिसरात शोध सुरू केला, मात्र बराच वेळ ती सापडलीच नाही. अखेर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिस व स्थानिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू असताना सर्वांचे घरासमोरील पाण्याच्या हौदाकडे लक्ष गेलं. शंका आल्याने हौदातील पाणी काढून पाहिलं असता, ईश्वरीचा मृतदेह त्यात आढळून आला. हे पाहताच हरणे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि परिसर शोकमग्न झाला.