चंद्रपूर : प्रेमीयुगुलांचे संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आले असून त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली, याबाबत विविध तर्क लावले जात आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रुपेश मधुकर मिलमिले (३२, रा.चिंतलधाबा) व शशिकला खुशाब कुसराम (२७, रा.भटारी) असे आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलांची नावे आहेत. भटारी येथील शशिकला कुसराम ही पतीपासून विभक्त झाली होती, तर रुपेशने दीड वर्षांपूर्वी पत्नीला घटस्फोट दिला होता. रुपेश भाजीपाला विक्रीसाठी भटारी येथे जात होता. यादरम्यान त्यांचे सुत जुळले. दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. घटनेच्या दिवशी दुपारी शशिकला व रुपेश हे दोघेही गणेश मिलमिले यांच्या शेतात गेले. त्यानंतर दोघांनी आपली जीवनयात्रा संपवली. रुपेशचा मृतदेह विहिरीत तर शशीकलाचा मृतदेह विहीरीच्या बाजूला आढळून आला.

हेही वाचा : बुलढाणा : शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू, संग्रामपूर परिसरातील घटना

हेही वाचा : यवतमाळ: पाच चोर, आठ चोऱ्या …घराला कुलूप दिसले की लगेच…

माहिती मिळताच पोंभूर्णा पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, मंगळवारी चार वाजतापर्यंत शवविच्छेदन करण्यात आले नव्हते. अचानक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दोन्ही मृतदेह फाॅरेन्सिक मेडीसिन टाॅक्सीकोलाॅजी शवविच्छेदनासाठी चंद्रपूरला पाठविण्यात आले. मंगळवारी सायंकाळी शवविच्छेदन करण्यात आले. पोंभुर्ण्यात शवविच्छेदन न झाल्याने या घटनेला एक वेगळे वळण मिळाले आहे. ही आत्महत्या आहे की हत्या याचा तपास करणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक धनराज सेलोकर, अंमलदार नैताम, हवालदार राजकुमार चौधरी करीत आहेत.