चंद्रपूर : मामाच्या मुलीच्या प्रेमात पडला, प्रेमभंग झाला आणि मग एक हाथ गमावलेल्या प्रेमीने बिहार राज्यातून ४५ हजारात देशी बंदूक विकत घेऊन ‘फिल्मी स्टाइल’ नाट्य असा प्रकार मूल या तालुक्याच्या ठिकाणी गौरव नितीन नरुले (वय २६) या युवकाच्या बाबतीत घडला. पण पोलिसांच्या तत्परतेने त्याच्या या ‘सैराट’ प्रेमकथेचा दुखद अंत टळला आणि दोघांचाही जीव वाचला!

चंद्रपूर जिल्ह्यातील मुल शहरातील गौरवची कहाणी म्हणजे जणू एखाद्या मसाला सिनेमाचा कच्चा माल. लहानपणी वीजेचा धक्का लागून त्याने एक हात गमावला. पण हा तरुण काही कमी नव्हता. एकाच हाताने दुचाकी भरधाव चालवायचा. त्याने दुचाकी ‘मॉडिफाय’ केली. त्याच्या दुचाकीत क्लच आणि एक्सलेटर एकाच हातात होते. त्याने मामाच्या मुलीच्या प्रेमात आधार शोधला. सुरुवातीला तिनेही त्याला ‘हिरो’ मानले. पण काही दिवसांतच ती ‘साइड रोल’मधून बाहेर पडली.

तत्पूर्वी एप्रिल महिन्यात आपल्या प्रेमकहाणी पुन्हा सुरु करण्यासाठी तो वरोरा येथे मामाच्या मुलीला भेटायला गेला. तिने त्याला भाव दिला नाही. प्रेमभंगाने गौरव सैराट झाला. त्याने ठरवले आता तिला आणि स्वतःला संपवायचे. गौरवने बिहारमधून ४५ हजारांत देशी कट्टा आणि सात काडतुसे खरेदी केली. कट्टा चालवायचा अनुभव नसल्याने त्याने पाच गोळ्यांचा सराव केला. दोन गोळ्या ‘फायनल शॉट’साठी ठेवल्या. एका गोळीने प्रेयसीला आणि दुसऱ्याने स्वतःला संपवायचं, असा त्याचा ‘प्लॅन’. २ ४ मे रोजी तो वरोऱ्यात प्रेयसीच्या मागावर गेला, पण सुदैवाने ती त्याच्या हाती लागली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इकडे गौरवकडे देशी कट्टा असल्याची कुजबुज पोलिसांपर्यंत पोहोचली. चंद्रपूर पोलिसांनी तत्परतेने तपास केला आणि गौरवला कट्ट्यासह जेरबंद केलं. त्याच्या ‘फिल्मी व्हिलन’ होण्याच्या स्वप्नावर पाणी फिरलं. प्रेमात काहीही होऊ शकते. पण बंदूक हातात घ्यायची गरज नाही, अशी समज देत पोलिसांनी गौरवला तुरुंगात पाठवले. आता त्याच्या प्रेमकथेचा ‘क्लायमॅक्स’ काय होतो, हे लवकरच कळेल. पण एक गोष्ट नक्की, पोलिसांच्या तत्परतेने या ‘सैराट’ प्रेमकथेचा दुखद अंत टळला आणि दोघांचे प्राण वाचले!