चंद्रपूर: बल्लारपूर – राजुरा दरम्यान निर्माणाधीन राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात ट्रकने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत राजुरा येथील ज्योती बंडू रागीट (४२) व मुलगी सेजल बंडू रागीट (१५) यांचा जागीच करुण अंत झाल्याची घटना दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार राजुरा येथिल पेठ वॉर्डातील ज्योती बंडू रागीट (४२) व त्यांची मुलगी सेजल बंडू रागीट या दोघीही (एम एच ३४बीएन ५५३८ ) क्रमांकाच्या ड्युएट गाडीने राजुरा येथुन बल्लारपूरकडे जात असताना वर्धा नदीचा पुल ओलांडल्यानंतर जलाराम बाप्पा मंदिराजवळ अज्ञात ट्रक ने दुचाकीला जबर धडक दिल्याने आई व मुलगी जागीच ठार झाल्या.
घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बामणी राजुरा ते आदिलाबाद व दुसऱ्या बाजूने आसिफाबाद पर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याची उंची वाढवण्याकरिता मातीचे ढिगारे टाकण्यात आले आहे. मात्र अजूनही ह्या मार्गाला संरक्षक भिंत बांधली नसल्याने माती रस्त्यावर घसरते. मागील काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाने तर ह्या मार्गावर गुडघाभर पाणी व चिखल साचले होते. आगामी पावसाळा बघता ह्या मार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन दुचाकीच नव्हे तर चारचाकी वाहनेही अपघातग्रस्त होण्याची दाट शक्यता असल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाने वेळीच उपाययोजना करणे आवश्यक असुन असे न झाल्यास अनेकांना प्राणाला मुकावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.