चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाघ कधी आणि कुठे दिसणार, हे सांगणे कठीण झाले आहे. वाघाचे नाव ऐकताच ग्रामस्थांचा थरकाप उडतो आणि तो अचानक समोर आला तर भीतीने बोलणेही बंद होते. असाच प्रकार नागभीड तालुक्यात उघडकीस आला. गोविंदपूर रस्त्यावर मंगरुडजवळ एका शेतकऱ्यासमोर अचानक वाघ उभा ठाकला. त्यामुळे शेतकऱ्याची बोबडी वळली. मात्र, त्याच वेळी तिथे एसटी महामंडळाची बस आली. बसचालक या शेतकऱ्यासाठी देवदूतच ठरला. चालकाने प्रसंगावधान राखत शेतकऱ्याला बसमध्ये घेऊन त्याचे प्राण वाचविले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या सर्वत्र मुसळधार, संततधार पाऊस पडत आहे. यामुळे शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. गोविंदपूर येथील रामदास खांदेवे नामक शेतकरी मंगरूड गावातील शेतात काम करण्यासाठी सायकलने गेले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काम आटोपून ते सायकलने गोविंदपूर या गावी परत येत होते. मंगरूड ते गोविंदपूर मार्गावरील कालव्याजवळील नागमोडी वळणावर खांदेवे यांच्या पुढे अचानक वाघ उभा ठाकला. शेतकरी व वाघ दोघेही एकमेकांसमोर उभे, दोघांच्या मागेपुढे कोणीच नाही. वाघ पाहून शेतकरी अवाक झाला. दोघांची नजरानजर झाली. वाघ हालचाल करणारच एवढ्यात एसटी बस त्याच रस्त्याने आली. बसचालक नव्हे तर साक्षात देवदूतच शेतकऱ्यासाठी धाऊन आला.

हेही वाचा : चंद्रपूर : “पूर पीडितांच्या पाठीशी,” मंत्री मुनगंटीवार यांचे आश्वासन; चिचपल्ली, पिंपळखुट येथील नागरिकांसोबत संवाद

शेतकरी व वाघाची नजर एमेकमेकांवर होती. तेवढ्यात मंगरुडहून गोविंदपूरकडे जाणारी एसटी बस तेथे पोहोचली. बस चालकाने तत्काळ बस थांबवून क्षणाचाही विलंब न लावता शेतकऱ्याला एसटी बसमध्ये बसवले. त्याची सायकलही बसमध्ये घेतली. एसटी बसमुळे वाघ लगेच जंगलाच्या दिशेने पळाला.

‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती,’ या म्हणीला साजेसा हा प्रकार शेतकऱ्याला जीवदान देणारा ठरला. एसटी बस गोविंदपूर गावात पोहोचली आणि शेतकरी गावात उतरला. वाघाला आपल्या समोर उभा पाहून शेतकरी काहीच बोलण्याच्या स्थितीत नव्हता. एसटी चालक व वाहकाने गावात हा प्रकार सांगितला. वाघ व शेतकऱ्यामध्ये घडलेल्या या प्रकाराची पंचक्रोशीत चर्चा आहे.

हेही वाचा : चंद्रपूर: वेकोलित ओबीसींना आरक्षण धोरणानुसार नोकरी…जाणून घ्या सविस्तर

बिबट्या घरात शिरला अन्…

तळोधी बाळापूर वन परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सावंगी (बडगे) या गावांमध्ये घुसून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्याने सचिन रतिराम रंदे यांच्या घरात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला करून एका शेळीला ठार केले. त्यानंतर बिबट्याने त्यांच्याच घरात ठाण मांडले. वनविभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तब्बल सहा तास प्रयत्न करण्यात आले.

सावंगी (बडगे) या गावांमध्ये सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बिबट घुसला. त्यानंतर बिबट्याने सचिन रंदे यांच्या गोठ्यात शिरून एका शेळीवर हल्ला करून ठार केले. त्यानंतर तिथेच ठाण मांडला. हि बाब सचिन रंदे व गावकऱ्यांना माहिती होताच त्यांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली.

हेही वाचा : चंद्रपूर : मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला! वाघाने केले महिलेला ठार

सायंकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी अरूप कन्नमवार हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचून घरासमोरील दरवाजाला पिंजरा लावण्यात आला. घरावर जाळे लावून बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, सर्वत्र मुसळधार पाऊस व संपूर्ण रस्ते पुरामुळे बंद झाल्यामुळे या बिबट्याला बेशुद्ध करण्याकरिता वनविभागाला कोणालाही पाचारण करता आले नाही. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कोणतीही मदत मिळाली नाही. पाऊस सुरू असतानाही या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले. मात्र, २४ जुलैला सकाळी ९:३० वाजेपर्यंत बिबट्या पिंजऱ्यात आला नाही. बिबट्याने वारंवार पिंजऱ्याजवळ येऊन हुलकावणी देत होता. शेवटी काहींनी कवेलूवर चढून बिबट्याला पिंजऱ्यात हाकलण्याचा प्रयत्न केला. शेवटी बिबट्याने घराचे कवेलू तोडून घरावर चढून घराच्या मागच्या दिशेने जंगलाच्या बाजूने धूम ठोकली. बिबट जंगलाच्या दिशेने पळाल्याने गावातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. यावेळी स्वाब संस्थेचे यश कायरकर, नितीन भेंडाळे, जीवेस सयाम, शुभम निकेशर, गिरीधर निकुरे, अमन करकाडे व वनपरिक्षेत्र अधिकारी अरूप कन्नमवार, क्षेत्र सहायक अरविंद मने, आर. एस. गायकवाड, रासेकर, वनरक्षक राजेंद्र भरणे, पंडित मेकेवाड, तोरले, अलाने, जोशी, वळजे पाटील, येरमे उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chandrapur tiger in front of farmer outside the tadoba andhari tiger reserve rsj 74 css
Show comments