चंद्रपूर : जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतंर्गत ३ हजार ५२२ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. साडेतीन हजारांपेक्षा अधिक या घरकुलांच्या निर्मितीवर ४७ कोटी ६१ लाख ७४ हजार ४०० रूपयांचा निधी दिला आहे. त्यापैकी ९ कोटी ५२ लाख रूपये वितरित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या ब्रम्हपुरी विधानसभा मतदार संघातील ३ हजार ४९३ लाभार्थी आहेत तर पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर मतदार संघातील केवळ २९ लाभार्थ्यांचा समावेश आहे. अन्य चार आमदारांना भोपळा मिळाला आहे. त्यामुळे इतर विधानसभा क्षेत्राला डावलल्याचा आरोप होत आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत समितीच्या जिल्हास्तरीय अध्यक्षांनी ३ हजार ५२२ वैयक्तिक घरकुलास प्रशासकीय मंजुरी देवून प्रस्ताव राज्य शासनाकडे निधी मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. या योजनेस पात्र सर्व लाभार्थी विमुक्त जाती व भटक्या जमातीतील आहेत. तसेच ज्यांच्याकडे जात प्रमाणपत्र आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळाला आहे. राज्य शासनाने सन २०२४-२५ करीता या घरकुलाना मान्यता दिली असून प्रति घरकुल १ लक्ष ३० हजार रूपये वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी ४७ कोटी ६१ लाख ७४ हजार ४०० रूपयांस मान्यता दिली असून ९ कोटी ५२ लाख रूपये लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, सन २०२३-२४ व २०२४-२५ मध्ये मंजूर करण्यात आलेले घरकुल हे केवळ बल्लारपूर, ब्रम्हपुरी, सावली, सिंदेवाही या चार तालुक्यातील आहे. यामध्ये २०२३-२४ मध्ये बल्लारपूर तालुक्यामध्ये २९, सिंदेवाहीमध्ये ६६६, ब्रम्हपुरी २६२, तर २०२४-२५ मध्ये ब्रम्हपुरी २००, सावली २३६५ लाभार्थी संख्या आहे. उर्वरित चार आमदारांच्या विधानसभा मतदार संघाचा व अकरा तालुक्यातील एकही लाभार्थ्यांला या योजनेमुध्य स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे चार आमदारांसह अकरा तालुक्यांवर अन्याय झाल्याची ओरड होत आहे.

हेही वाचा…नागपूर : विधानसभेत गाजला ‘अंबाझरी’चा मुद्दा, नितीन राऊत म्हणतात, “पुतळा की लोकांचे जीव…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांमुळेच ३ हजार ४९३ लाभार्थ्यांना घरकुल

ज्याचे तत्कालीन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना कार्यान्वित केली. आज विरोधी बाकावर बसूनही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजातील ३४९३ लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून शासन स्तरावर मागणी रेटून धरली. त्यामुळे सिंदेवाही, सावली व ब्रह्मपुरी तालुक्यातील ३४९३ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून यामुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली असल्याचे कळविले आहे.