चंद्रपूर : शहरातील विविध समस्यांकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने महापालिकेसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून विविध समस्याकडे लक्ष वेधण्यात आले. अमृत पाणी पुरवठा योजना, शहरातील खड्डेमय झालेले रस्ते तथा अस्वच्छता याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशीही मागणी केली.
विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, युवा नेत्या शिवानी वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात आणि युवक काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष राजेश अडूर यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अमृत योजनेच्या ढिसाळ कामामुळे चंद्रपूरकर जनता चांगलीच त्रस्त झाली आहे. अजूनही या योजनेचे काम पूर्ण झाले नाही. काही भागात अजूनही पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असून, अनेकांना पाण्याची प्रतीक्षा लागून आहे. स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे दिसून येत आहे.
हेही वाचा : कुख्यात डॉन अरुण गवळी पुन्हा एकदा कारागृहाबाहेर, गवळीला मिळाली संचित रजा
त्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मोकाट गुरे, कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त आहे. मोकाट कुत्रे, गुरांचा बंदोबस्त करण्यात यावा, मनपा शाळेचा दर्जा वाढविण्यात यावा, शहरातील रस्ते, फुटलेले चेंबर यांची दुरुस्ती करण्यात यावी, दिवाबत्तीची समस्या सोडविण्यात यावी आदी मागण्यांकडे यावेळी मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. दरम्यान, मागण्यांचे निवेदन मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांना देण्यात आले. यावेळी आयुक्त पालीवाल यांनी ज्युस पाजून उपोषण सोडविले.
हेही वाचा : नागपुरात नर्सिंगच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
निवेदनातील मागण्या लवकरात लवरक सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आंदोलनात युवा नेत्या शिवानी वडेट्टीवार, काँग्रेसचे माजी अध्यक्ष विनायक बांगडे, शहर जिल्हा काँग्रेस समिती अध्यक्ष रितेश (रामु )तिवारी, माजी नगरसेवक नंदू नागरकर, माजी सभापती संतोष लहंमगे, सेवादल अध्यक्ष सूर्यकांत खनके, अंबिकाप्रसाद दवे, काका, युसूफ भाई, महिला चंद्रपुर शहर अध्यक्ष चंदा वैरागडे, चित्रा डांगे, माजी नगरसेवक अमजद ईरानी, प्रशांत दानव, निलेश खोबरागडे, माजी नगरसेविका ललीता रेवालीवार, संगीता भोयर, वीणा खनके, सकीना अंसारी, प्रवीण पडवेकर रूचित दवे, रमीज शेख, सचिन कत्याल कुणाल चहारे व अन्य काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.