पूर्व विदर्भात ८९ टक्के गर्भपात खासगी केंद्रांमध्ये!

नागपुरात २०१९- २०, २०२०- २१, २०२१- २२ या तीन वर्षांत सर्वाधिक म्हणजे ३४ हजार १६२ गर्भपात झाले.

|| महेश बोकडे

गेल्या तीन वर्षांत ७०,७४१ गर्भपातांची नोंद

नागपूर : वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये एका खासगी केंद्रातील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणांची राज्यभर चर्चा सुरू असतानाच गेल्या तीन वर्षांत पूर्व विदर्भात नोंदवलेल्या ७० हजार ७४१ अधिकृत गर्भपातांपैकी ८९ टक्के गर्भपात हे खासगी केंद्रांवर झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आता शासनाकडून गर्भपात केंद्रांची तपासणी सुरू असल्याने आधी झालेले गर्भपात नियमानुसारच होते की नाही, हेही तपासले जाण्याची शक्यता आहे. 

नागपुरात २०१९- २०, २०२०- २१, २०२१- २२ या तीन वर्षांत सर्वाधिक म्हणजे ३४ हजार १६२ गर्भपात झाले. सर्व नियमानुसार प्रक्रिया करूनच झाले. शहरातील या एकूण गर्भपातातील १ हजार ५०३ गर्भपात शासकीय तर ३२ हजार ६५९ गर्भपात खासगी  गर्भपात केंद्रांवर झाले. नागपूर ग्रामीणला झालेल्या एकूण ६ हजार १२१ गर्भपातांपैकी १ हजार ७१ शासकीय केंद्रावर तर ५ हजार ५० खासगी केंद्रांवर झाले.

भंडारा जिल्ह्यात ८८८ गर्भपात शासकीय तर ५ हजार ६०५ खासगीत असे एकूण ६ हजार ४९३, चंद्रपूर ग्रामीणला १ हजार ५९४ शासकीय, २ हजार ९६२ खासगी असे एकूण ४ हजार ५५६ गर्भपात झाले. चंद्रपूर महापालिकेत शासकीय केंद्रात एकही गर्भपाताची नोंद नसून खासगीत ५ हजार ७१३ गर्भपात झाले. गडचिरोलीत शासकीय केंद्रात १ हजार २७३ तर खासगीत १ हजार ८८८ असे एकूण ३,१६१, वर्धेत १,२६५ शासकीय तर ६,६७० खासगी असे एकूण ७,९३५, गोंदियात २७२ शासकीय तर २ हजार ३२८ असे एकूण २ हजार ६०० गर्भपात झाले. त्यामुळे पूर्व विदर्भात नोंदवलेल्या ७० हजार ७४१ गर्भपातांपैकी शासकीय केंद्रात ७ हजार ८६६ (११.११ टक्के) तर खासगी केंद्रात ६२ हजार ८७५ (८८.८९ टक्के) गर्भपात झाल्याची नोंद सार्वजिनक आरोग्य विभागाकडे आहे. या विषयावर आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. परंतु पूर्व विदर्भातील सर्व जिल्हा शल्यचिकित्सक व स्थानिक स्वराज्य संस्थेतील कार्यालयांनी या संख्येला दुजोरा दिला आहे. या सगळ्यांनी हे गर्भपात कायद्यानुसार सर्व प्रक्रिया करून झाल्याचे सांगितले.

नियम काय?

मार्च २०२१ रोजी केलेल्या कायद्यातील सुधारणेनंतर विशिष्ट परिस्थितीत गर्भपात करण्यासाठीचा कालावधी आता २४ आठवडे झाला आहे. त्यासाठी गर्भवतीच्या जिवाला धोका, मानसिक व शारीरिक आरोग्याला धोका, जन्माला येणाऱ्या बाळाला व्यंग, महिलेला बलात्कारातून गर्भधारणा, अशी कारणे असणे आवश्यक आहे. वैद्यकीय मंडळाद्वारे निदान झालेल्या गर्भाच्या विकृतींच्या बाबतीत गर्भपाताची कमाल मर्यादा लागू होत नाही.  २० आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्यासाठी एका डॉक्टरचा आणि गर्भावस्थेच्या २० ते २४ आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्यासाठी दोन डॉक्टरांचा सल्लाही कायद्यानुसार आवश्यक आहे.

८० टक्केच्या जवळपास रुग्ण हे खासगी डॉक्टरांकडेच उपचाराला येतात. उपचारांदरम्यान डॉक्टरांना काही अनुचित आढळल्यास त्याची गर्भवतीसह, कुटुंबीयांना माहिती दिली जाते. कायद्याच्या चौकटीत पुढील प्रक्रिया होते. खासगीत गर्भपाताचे अनुचित  प्रकार होत नाहीत.

-डॉ. सचिन गाथे, सचिव, इंडियन मेडिकल असोसिएशन, नागपूर.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In east vidarbha 89 percent of abortions are in private centers akp

Next Story
“बायको सोडून गेल्यानं मला सगळे मोदी म्हणतात”; पटोलेंनी उल्लेख केलेल्या ‘त्या’ गावगुंडाचा दावा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी