दरवाढीमुळे घरोघरी महागाईचा भडका

नागपूर : गेल्या पाच महिन्यांपासून घरगुती वापराच्या सिलेंडरची दरवाढ  सुरू आहे. गेल्या महिन्यात सिलेंडरचा दर ७२६.५० होता. डिसेंबरमध्ये ते ७४१ रुपयांवर पोहचले. त्यामुळे महिनाभरात १४.५० रुपयांनी वाढ  झाली आहे. गेल्या ऑगस्टपासून ते डिसेंबपर्यंत सिलेंडरची १२० रुपयांनी दरवाढ  झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.

घरगुती सिलेंडर दर कमी होण्याचे नाव घेत नाही. ऑगस्टमध्ये १४.२ किलोचे घरगुती सिलेंडरचा दर तब्बल १०५ रुपयांनी वाढवण्यात आला. त्यानंतर सप्टेंबरमध्ये ५० रुपये तर अक्टोबरमध्ये ७६.५० रुपयांनी वाढले. मात्र नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी सिलेंडर ७६ रुपयांनी महागले होते. आता डिसेंबरमध्ये दरवाढीला ब्रेक लागेल अशी सर्वसामान्यांना अपेक्षा असताना या महिन्यातही सिलेंडरचे दर १४.५० रुपयांनी वाढले. सध्या विनाअनुदानित सिलेंडरचा दर ७४१ रुपये झाला आहे. गेल्या महिन्यात हाच दर ७२६.५० होता. सातत्याने सिलेंडरची दरवाढ होत असल्याने गृहिणींचे बजेट बिघडले आहे. ही दरवाढ पाहता सर्वसामान्यांना सिलेंडर आता परवडत नसल्याचे चित्र आहे. एकीकडे सरकारने रॉकेल देणे बंद करून गरिबांना जाणीवपूर्वक सिलेंडरकडे वळवले. मात्र त्यांनाही महागडे सिलेंडर परवडणारे नसल्याने  अनेकजण परत चुलीकडे वळले आहेत. दारिद्रय़रेषेखालील महिलांना चुलीपासून दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला गॅस योजना अंमलात आणली. मात्र तिला जिल्ह्यात फारसा लाभ मिळाला नाही. अनेकांनी शंभर रुपये देऊन पहिल्यांदा सिलेंडर उचलले. मात्र त्यानंतर ते शोभेची वस्तू बनल्याचे वास्तव आहे. दरमहिन्याच्या दरवाढीमुळे महागाईचे चटके सर्वसामान्यांना जाणवत आहेत.

पाच महिन्यातील दरवाढ

ऑगस्ट – ६२१.०० रु.

सप्टेंबर – ६३७.०० रु.

ऑक्टोबर – ६५०.०० रु.

नोव्हेंबर – ७२६.५० रु.

डिसेंबर – ७४१.०० रु.