गडचिरोली : लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर गडचिरोली- चिमूर क्षेत्रातून आमदार डॉ. देवराव होळी पाठोपाठ माजी मंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांचे धाकटे बंधू अवधेशराव आत्राम यांनीही उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याने भाजपमध्ये अंतर्गत कुरघोड्या पाहायला मिळत आहे. यामुळे विद्यमान खासदार अशोक नेते यांच्या गोटात अस्वस्थता दिसून येत आहे. आधीच या जागेवर महायुतीकडून मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दावा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने विविध पक्षांकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे. मात्र, यंदा उमेदवारीकरिता काँग्रेससह भाजपमध्ये देखील टोकाची स्पर्धा पाहायला मिळत आहे. मागील वर्षभरापासून भाजपकडून विद्यमान खासदार अशोक नेते लोकसभेच्या तयारीला लागले आहेत. परंतु मधल्या काळात बदललेल्या राजकीय समीकरणामुळे अजित पवारांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट महायुतीत सामील झाला. तेव्हापासून लोकसभेकरिता उमेदवार बदलाचे वारे वाहू लागले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आपण लोकसभा लढवणार असल्याचे जाहीर केल्याने भाजपचे नेते व कार्यकर्ते संभ्रमात आहे. यात आता पुन्हा एक भर पडली असून आमदार डॉ. देवराव होळी पाठोपाठ माजी मंत्री अम्ब्रीशराव यांचे धाकटे बंधू अवधेशराव आत्राम यांच्यासाठी अहेरी विधानसभेतील कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आहे.

हेही वाचा : युवक काँग्रेसच्या आंदोलनावरून नागपूरमध्ये पक्षांतर्गत बेकीचे दर्शन

नुकतेच भाजप नेतृत्वाकडून नव्या दमाच्या उमेदवाराला संधी देण्याचे सूतोवाच करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर अम्ब्रीशराव आत्राम यांच्या समर्थकांनी अवधेशराव आत्रामांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यापूर्वीच भाजप आमदार होळी यांनीदेखील लोकसभा क्षेत्रात दौरे करून आपण पण इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. तेव्हापासून भाजपमध्ये होळी विरूद्ध नेते असे शीतयुद्ध सुरू झाले होते. परंतु वरिष्ठ नेतृत्वाने कानपिचक्या दिल्याने आमदार होळी सावध झाले. मात्र, अहेरी विधानसभेतील भाजप कार्यकर्त्यांनी नेतेंचा विरोध करून नव्या दमाच्या अवधेशराव आत्राम यांना संधी देण्याची मागणी रेटून धरली आहे. समाजमाध्यमावरदेखील त्यासंदर्भातील चर्चांना ऊत आला आहे. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत कुरघोड्या सुरू असल्याचे चित्र आहे. काही महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये अम्ब्रीशराव समर्थकांना डावलून नेते समर्थकांना संधी देण्यात आली होती. मात्र, आत्रामांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर कार्यकारिणीमध्ये बदल करावा लागला होता. तेव्हापासून आत्राम समर्थक भाजप पदाधिकाऱ्यांनी नेतेंच्या नावाला विरोध सुरू केला आहे. हे विशेष.

हेही वाचा : विदर्भातील या आमदारांनी स्पष्टच सांगितले, “होय आम्ही…”

“भाजपमध्ये कुठलेही मतभेद नाही. आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून कामाला लागलो आहे. आता पक्षातील काही कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली असेल तर ते स्वाभाविक आहे. राजकारणात पुढे जावे असे प्रत्येकाला वाटते. पण शेवटी जो निर्णय वरिष्ठ नेतृत्व घेतील तो सर्वांना मान्य असेल.” – प्रशांत वाघरे, भाजप जिल्हाध्यक्ष गडचिरोली</p>

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In gadchiroli competition among bjp leaders to get lok sabha ticket for upcoming gadchiroli lok sabha election 2024 ssp 89 css
First published on: 14-02-2024 at 11:57 IST