गडचिरोली : अवघ्या दोन दिवसांपूर्वी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हा दौऱ्या करून आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला होता. मात्र, मंत्र्यांनी पाठ फिरवताच गडचिरोलीतील शासकीय आरोग्य यंत्रणेची विदारक स्थिती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. एका अपघातग्रस्त तरुणाला वेळेवर उपचार तर सोडाच, पण पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकाही नाकारण्यात आल्याचा संतापजनक प्रकार जिल्हा रुग्णालयात उजेडात आला आहे.
आरमोरी तालुक्यातील चुरमुरा येथील विकास गुरुनाथ ताडपल्लीवार (२८) हा तरुण १६ फेब्रुवारी रोजी भीषण अपघातात गंभीर जखमी झाला. पत्नीला कामावर सोडून घरी परतत असताना ट्रकने दिलेल्या धडकेत विकासच्या डाव्या पायाचे हाड मोडले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या मजुराला स्थानिकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
दुपारी १ वाजता दाखल केलेल्या या रुग्णावर सायंकाळी ५ वाजेपर्यंत केवळ थातूरमातूर मलमपट्टी करण्यात आली. ‘एक्स-रे’ मशीन बंद आहे आणि अस्थिरोगतज्ज्ञ उपलब्ध नाहीत, असे कोरडे उत्तर देऊन रुग्णालयाने आपली जबाबदारी झटकली. धक्कादायक बाब म्हणजे, गंभीर अवस्थेत असलेल्या या रुग्णाला चंद्रपूरला हलवण्यास सांगूनही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली नाही. पोटचा गोळा वेदनेने तडफडत असताना आणि खिशात दमडी नसताना, हतबल पित्याने अखेर उसनवारी करून खासगी रुग्णवाहिकेचे भाडे भरले आणि मुलाला चंद्रपूरला नेले.
विकासचे हाल इथेच संपले नाहीत. चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रात्र काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिथेही शस्त्रक्रिया शक्य नसल्याचे सांगत नागपूरला नेण्याचा सल्ला देण्यात आला. दोन दिवस एका शासकीय रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हेलपाटे मारल्यानंतर पित्याची सहनशक्ती संपली. अखेर मुलाचा जीव वाचवण्यासाठी या गरीब कुटुंबाने ब्रह्मपुरी येथील एका खासगी रुग्णालयाची वाट धरली. तिथे उपचार सुरू झाले असले तरी, खासगी उपचारांचा खर्च पेलणे या मजुराच्या आवाक्याबाहेर गेले आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळातूनही तीव्र संताप व्यक्त होत आहे. मंत्र्यांचे दौरे केवळ कागदी घोडे नाचवण्यासाठी आहेत का, असा सवाल भाकपचे जिल्हा सचिव अमोल मारकवार यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री स्वतः पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात साध्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला तीन शहरे फिरावे लागत असेल, तर या अवाढव्य इमारतींचा आणि सरकारी निधीचा उपयोग काय, असा प्रश्न आता सर्वसामान्य गडचिरोलीकर विचारत आहेत.
मी या रुग्णाला स्वतः पाहिले होते. त्याला रुग्णवाहिका का मिळाली नाही, याची माहिती घेऊन सांगते.” -डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा शल्यचिकित्सक
