लोकसत्ता टीम वर्धा : स्वातंत्र्य मिळून ७५ पेक्षा अधिक वर्ष लोटली. पण अद्याप अशी अनेक गावे आहेत जिथे विकासाची किरणे पोहचलीच नाही. डोळ्यादेखात म्हातारे कोतारे पुरात वाहून जाण्याचा अनुभव घेणाऱ्या गिरोली गावची कथा तशीच. लोकप्रतिनिधी उदासीन म्हणून मग प्रशासन पण ढिम्म. अखेर गांधीजींची विश्वस्ताची प्रेरणा घेऊन काम करणाऱ्या जमनालाल बजाज सेवा संस्थेने पूल बांधण्याचा विडा उचलला. तालुक्यातील गिरोली ढगे हे हजार लोकवस्तीचे गाव टेकड्यांच्या पायथ्याशी वसले आहे. गावालगत असलेल्या खोल नाल्यातून वाट काढीत प्रामुख्याने शेतकरीच असलेल्या गावकऱ्यांची वहिवाट असायची. पावसाळ्यात नाल्यास पूर आला की दीड किलोमिटरचा फेरा मारून गावकरी इतरांच्या संपर्कात येत. आणखी वाचा-गडचिरोली : जखमी बापासाठी खाटेची कावड ; मुलाची चिखलातून १८ किलोमीटर पायपीट या नाल्यावर पूल बांधून देण्याची मागणी गावकरी ४० वर्षापासून करीत होते. मात्र प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींनी त्यांची दखल घेतली नव्हती. ग्रामपंचायतनेही ठराव घेत पूलाची मागणी केली. मात्र काहीच होत नसल्याचे पाहून गावातील एक होतकरू नितीन ढगे या युवकाने खटपट सुरू केली. ग्रामीण कार्यास मदत करण्याची ख्याती असणाऱ्या जमनालाल बजाज संस्थेचे मुख्याधिकारी संजय भार्गव यांना भेटून त्यांनी पूलाची समस्या सांगितली. संस्थेच्या चमूने गावात भेट देवून खर्च व अन्य बाबी तपासल्या. नागरिकांचाही सहभाग असला पाहिजे म्हणून १० टक्के वर्गणी गावातून गोळा करण्यात आली आणि पूलाचे काम सुरू झाले. १० लाख रूपयाचा खर्च अपेक्षीत असतांना संस्थेचे अभियंता वामन तिमांडे यांनी आपल्या कल्पकतेतून स्वस्तात पण टिकावू असा पूलाचा सांगाडा केवळ तीन लाख रूपयात तयार केला. काम लवकरच पूर्ण होत पूल वाहतूकीसाठी खुला झाला. त्याचे उद्घाटन संजय भार्गव, राजेंन्द्र खर्चे, वामन तिमांडे, उमेश गडकरी, अविनाश अंबुलकर आदींच्या उपस्थित करण्यात आले. लगेच गावकऱ्यांनी अत्यंत आनंदात पूलावरून प्रवास करणे सुरू केले. विशेष म्हणजे एकदा याच नाल्याला पूर आला होता. आणखी वाचा-Chandrapur Updates: धक्कादायक! दहाव्या वर्गातील विद्यार्थाने संपविले जीवन त्यात दोन व्यक्ती व एक म्हातारी वाहून गेली होती. पण तिघेही वाचले होते. आता गावात पूल करण्यासाठी थोडाबहुत हातभार लागणार हे माहित होताच याच म्हातारीने आपल्या क्षमतेनुसार आर्थिक योगदान दिल्याचे विकास जीवतुडे यांनी सांगितले. संस्थेचे संजय भार्गव याप्रसंगी म्हणाले की शेतकऱ्यांना मदतीचे हात देण्याचे संस्थेचे धोरणच आहे. या गिरोली गावातील समस्या गंभीर असल्याचे दिसून आल्याने तिथे वाहतूकीसाठी सोयीचा ठरणारा लहान पूल संस्थेने बांधून दिला आहे.