नागपूर : राज्यात गेल्या सहा महिन्यांत महिलांविरुद्धच्या गुन्ह्यात मोठी वाढ झाली असून राज्यात सर्वाधिक लैंगिक अत्याचाराच्या घटनेत मुंबई पहिल्या स्थानावर तर ठाणे शहर दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईत सर्वाधिक ३९७ बलात्काराचे गुन्हे दाखल असून त्यापाठोपाठ ठाणे शहरातत १४८ गुन्हे दाखल आहेत. ही धक्कादायक आकडेवारी महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावरून समोर आली आहे. राज्यात महिला सुरक्षेस प्राधान्य देणार असल्याचा गृहमंत्र्यांचा दावा फोल ठरताना दिसत आहे. गेल्या सहा महिन्यांची आकडेवारी बघता राज्यात महिलांविरुद्धच्या गुन्ह्यात मोठी वाढ झाली आहे. अल्पवयीन मुली, तरुणी आणि विवाहित महिलांवर बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. यासोबतच अश्लील चाळे, शेरेबाजी, लज्जास्पद वर्तन आणि विनयभंगाच्याही घटना वाढत आहेत. गेल्या सहा महिन्यात मुंबईत तब्बल ३९७ बलात्काराच्या घटना घडल्या. याप्रकरणी ३७४ आरोपींना अटक करण्यात आली. विनयभंगाच्या ९७८ घटना घडल्या. दुसऱ्या क्रमांकावर मुख्यमंत्र्यांचे शहर ठाणे आहे. येथे १४८ बलात्काराच्या घटना घडल्या असून विनयभंगाच्या २६० घटना घडल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर नागपूर असून नागपुरात १४७ बलात्काराच्या तर २४० विनयभंगाच्या घटना घडल्या. चौथ्या क्रमांकावर पुणे असून तेथे १४४ बलात्काराच्या तर २४७ विनयभंगाच्या घटना घडल्या. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातंर्गत बलात्काराच्या १०१ तर विनयभंगाच्या १५२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हेही वाचा : तरुणांसाठी खुशखबर: राज्यात पुन्हा ७००० हजार पदांसाठी पोलीस भरती कौटुंबिक हिंसाचारात पुणे पहिल्या स्थानावर राज्यात कौटुंबिक हिंसाचाराच्याही प्रमाणात वाढ झाली आहे. विवाहित महिलांविरुद्ध गुन्हे किंवा घरगुती हिंसाचाराच्या घटनेत पुणे शहर पहिल्या स्थानावर आहे. पुण्यात सर्वाधिक २१८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. दुसऱ्या स्थानावर मुंबई असून तेथे १८५ गुन्हे कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तसेच गृहमंत्र्यांच्या नागपुरातही १२४ गुन्ह्यांची नोंद असून राज्यात हे शहर तिसऱ्या स्थानावर आहे. राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांबाबत राज्य महिला आयोग गंभीर आहे. पोलिसांनी महिलाविषयक गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करावा. आम्हीसुद्धा अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन दखल घेत असतो. आभा पांडे, सदस्य, राज्य महिला आयोग.