चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी- व्याघ्र ताडोबालगतच्या १३ गावामध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेचा अर्थात ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ वापर करून मानव-वन्यजीव संघर्ष कमी केल्याबद्दल गौरवपूर्ण उल्लेख केला. यामुळे ताडोबाचे नाव पुन्हा एकदा जागतिक पटलावर आले आहे.

३ मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आहे . हा दिनविशेष लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात कृत्रिम बुद्धीमत्तेवर कार्यरत प्रणालीचा आवर्जुन उल्लेख केला. राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ताडोबामध्ये ही प्रणाली साकारण्यात आली आहे. राज्यात चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या सर्वाधिक आहे. वाघांसोबतच बिबट, अस्वल आदी वन्यजीवांची संख्याही येथे मोठी आहे. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटक येथे व्याघ्र सफारीच्या पर्यटनासाठी येथे येत असतात. वाघाची वाढती संख्या त्यामुळे या भागांमध्ये मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे.

हेही वाचा…छोट्या पक्षांचा भारतीय जनता पक्षाने सन्मान केला – बावनकुळे

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून कृत्रिम बुद्धीमत्तेचा अर्थात ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’चा वापर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार व्याघ्र प्रकल्पाच्या आसपास असलेल्या १३ गावांसाठी ‘एआय अलर्ट सिस्टिम’ कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या आधारावर कोणताही हिंस्र वन्यजीव गावांच्या आसपास येत असल्यास ‘एआय’च्या माध्यमातून ग्रामस्थांना तत्काळ मोबाइलवर सतर्कतेचा एसएमएस मिळतो. ताडोबा-अंधारी प्रकल्पात कार्यान्वित झालेल्या या सतर्कता प्रणालीमुळे जंगलाला लागून असलेल्या १३ गावांमधील ग्रामस्थांवर वन्यजीवांचे हल्ल्यांपासून संरक्षण मिळाले आहे.

राज्य शासनाच्या वन विभागाने राबविलेला उपक्रम व विश्व वन्यजीव दिवसाचा संदर्भ जोडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या ‘मन की बात’मध्ये वनक्षेत्रात सुरू झालेल्या ‘एआय’ वापराची स्तुती केली. पंतप्रधान मोदी यासंदर्भात बोलतांना म्हणाले कि, तंत्रज्ञानाचा वापर वाढत जाणार आहे. सिमेंटच्या जंगलाचे प्रमाण वाढले तर त्याचा परिणाम वन्यजीव आणि जैवविविधतेवर होणार आहे. अशात वन्यजीव आणि वन संवर्धन काळाची गरज आहे. ताडोबात २५० च्या वर वाघ झाले असून या परिसरात मानव-वन्यजीव संघर्ष वाढला आहे. वन आणि वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी स्मार्ट एआय प्रणाली वापरण्यात आली आहे.

हेही वाचा…मनोज जरांगेंचे देवेंद्र फडणवीसांवर खळबळजनक आरोप; म्हणाले, “मला सलाईनमधून विष…”

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वापरण्यात येत असलेली ‘एआय’ प्रणाली मोलाची ठरत असून प्रत्येक व्यक्तीने तंत्रज्ञानाचा मानव कल्याणासाठी व देशहितासाठी वापर केल्यास त्यातून संभाव्य संकटांवर वेळीच मात करणे शक्य होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंतच्या ‘मन की बात’मध्ये अनेकदा महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांचा, व्यक्तींचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. त्यातील विदर्भातील अनेक प्रकल्प व व्यक्तींचा समावेश आहे. यंदाच्या ‘मन की बात’मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राने व त्यातल्या त्यात विदर्भाने आपला डंका कायम ठेवला आहे.