नागपूर : नागपुरात कर्करोगाने लिंग गळून पडलेल्या रुग्णावर यशस्वी लिंगपुनर्रचना शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता आणखी एका रुग्णालयात एका १२ वर्षीय मुलीच्या पाठीचा कणा पाठीच्या क्षयरोगाने वाकडा झाला होता. या मुलीवरही तज्ज्ञ डॉक्टरांनी नागपुरात गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. त्यामुळे एक मुलीचे जगने सुकर झाले आहे.
उपराजधानीतील शासकीय व खासगी रुग्णालयांत आता गुंतागुंतीच्या न्यूरोसर्जरीशी संबंधित जवळपास सर्वच शस्त्रक्रिया उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे विदर्भासह शेजारच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलांगणातीलही रुग्ण येथे उपचारासाठी येतात. १२ वर्षीय मुलीला पाठीच्या क्षयरोग होता. त्यामुळे तिच्या पाठीचा कणा वाकडा झाल्याने ते वृद्धांसारखी कुबड काढून चालत होती. तिला चालतांना प्रचंड त्रास होत होता. येथे तिच्यावर औषधोपचार (अँटी-कोच थेरपी – एकेटी) सुरू झाला. ब्रेन आणि स्पाइन सर्जन आणि असोसिएट प्रोफेसर डॉ. परेश कोरडे यांना तपासणीत तिच्या दोन मणक्यांचे नुकसान झाल्याचे निदर्शनात आले.
तिच्या पाठीला ९० अंशाने वाकडेपणा आला होता. या अवस्थेमुळे ती पुढे आयुष्यभर अंथरुणाला खिळून राहण्याचा धोका होता. तिला भविष्यात हालचाल, करता आली नसती. त्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रियेचा निर्णय झाला. तब्बल सहा तास चाललेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्यामुळे मुलीचा कणा सरळ झाला असून ती सामान्यांप्रमाने उभी राहू शकत आहे. शस्त्रक्रियेसाठी बधिररोग तज्ज्ञ डॉ. प्राची कोरडे, डॉ. फिलिप्स अब्राहम, डॉ. प्रतिभा देशमुख, डॉ. अंजली बोरकर, डॉ. प्रियांका टिकैत, डॉ. राजीव सोनारकर, डॉ. सी. एम. बोकडे यांची भूमिका महत्वाची होती. या चमूचे संचालक डॉ. अनुप मरार यांनी अभिनंदन केले.
शस्त्रक्रियेत काय झाले…
सहा तास चाललेल्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमध्ये डॉ. परेश कोरडे आणि त्यांच्या चमूने रॉड्स, स्क्रू आणि मेटल केजच्या मदतीने मुलीचा वाकलेला पाठीचा कणा सरळ केला. मुलीचे मणके लहान आणि नाजूक असतानाही, डॉक्टरांनी अतिशय कौशल्याने तिचा कणा योग्य रचनेत आणत मजबूत केला.
मुलीला नीट बसता, उठता येत नव्हते…
सदर मुलगी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील आहे. तिला सुरुवातीला फक्त पाठदुखी होती. स्थानिक उपचारांचा प्रयत्नानंतरही तिच्या आजाराचे निदान झाले नसल्याने तिची प्रकृती बिघडली. कालांतराने तिला वाकून चालावे लागत होते. तिला नीट बसता किंवा उभे राहता येत नव्हते. तिचे वजन खूप कमी झाले आणि तिच्या पाठीवर एक मोठा उंचवटा दिसू लागला. या अवस्थेला ‘गिब्बस डिफॉर्मिटी’ म्हणतात. त्यामुळे ती कायमस्वरूपी अपंग होण्याचा आणि मूत्र व मलाशयावर ताबा राहाण्याचा धोका निर्माण झाला होता. परंतु यशस्वी उपचाराने मुलगी बरी झाली आहे.