नागपूर : सरकारकडून शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षीत प्रवासासाठी बरेच कायदे केले गेले. परंतु काही स्कूल बस व ऑटोरिक्षा चालक झटपट पैसे कमवण्यासाठी या नियमांना केराची टोपली दाखवत आहे. नागपुरात एकाच ऑटोरिक्षात १३ शालेय विद्यार्थ्यांना कोंबून प्रवास केला जात असल्याचे पुढे आल्यावर येथील वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नागपूर जिल्ह्यात अनफीट स्कूल बसेसमुळे शालेय वाहतूकीदरम्यान त्यातून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्राण धोक्यात आहे. त्यामुळे तातडीने नागपुरातील स्कूल बसेसची योग्यता तपासणी करा, अशी मागणी आमदार प्रवीण दटके यांची काही दिवसांपूर्वीच औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधान सभेत केली होती. यावेळी दटके यांनी नागपूरसह राज्यात सर्वच ठिकाणी शाळा सुरू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी स्कूल बसच्या माध्यमातून प्रवास करत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनात आणले.

दरम्यान नागपूर शहरात धावणाऱ्या ८३८ स्कूल बसेस फिटनेस सर्टिफिकेट शिवाय धावत आहेत, याबाबतची जनहित याचिका माननीय उच्च न्यायालयात सादर आहे. परिवहन विभागाने तात्काळ याची गंभीर दखल घेऊन नागपूर शहरात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेस, व्हॅन, ऑटो रिक्षा यांचे रेकॉर्ड तपासावे. जिल्ह्यात एकही अनफिट रिक्षा बस किंवा व्हॅन रस्त्यावर धावणार नाही याकरिता कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार प्रवीण दटके यांनी सभागृहात औचित्याचा मुद्द्याद्वारे केली. त्यानंतर किमान शहरातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षीत व्हावी म्हणून वाहतूक पोलीस व आरटीओकडून काळजी घेणे अपेक्षीत होते. परंतु शहरातील बऱ्याच भागात स्कूलबस व ऑटोरिक्षा चालक क्षमतेहून जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना दिसत आहे. एका ऑटोरिक्षात चक्क ५ ते ६ विद्यार्थी नव्हे तर १३ विद्यार्थ्यांना कोंबून शाळेत नेले जात असल्याचेही पुढे आले आहे. त्याबाबतचे वृत्त एका माध्यमाने पुढे आणले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिव्हिल लाईन्समधील महापालिकेच्या पुढील घटना

नागपुरातील सिव्हिल लाईन्स परिसरातील महापालिकेच्या पुढून जाणाऱ्या एका ऑटोरिक्षात शालेय मुले कोंबून नेली जात होती. निरीक्षण केले असता त्यात चक्क १३ मुलांना बसवल्याचे पुढे आले होत. दरम्यान एका ऑटोरिक्षामध्ये तीन प्रवाश्यांची क्षमता असतांना चक्क १३ मुलांची वाहतूक होत असल्याचे बघून नागरिकांनाही आश्चर्याचा धक्काच बसला. या घटनेमुळे नागपुरात शहर वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकार्यांचे शालेय वाहतुक करणाऱ्या वाहनांवर नियंत्रण आहे काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.