नागपूर : एका युवकाने प्रेमप्रकरणानंतर घरच्यांचा विरोध झुगारून मित्राच्या मदतीने पळून जाऊन लग्न केले. पती-पत्नीचा व्यवस्थित संसार सुरू असताना युवकाच्या शकुनी असे नाव असलेल्या मामीने पत्नीशी मित्राचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप लावून भाच्याचा संसार विस्कटवला. मात्र, भरोसा सेलने मित्र-मैत्रीण आणि पती-पत्नीच्या नात्यातील गुंता अलगद सोडवून विस्कटलेला संसार पुन्हा सावरला. आशीष, तनुश्री आणि विलास (काल्पनिक नावे) हे तिघेही मित्र-मैत्रिणी असून यशोधरानगर वस्तीत राहतात. पदवीचे शिक्षण घेताना आशीष आणि तनुश्रीचे प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनीही विलासला सांगितले आणि आई-वडिलांशी चर्चा करून लग्नाची बोलणी करण्याची जबाबदारी सोपवली. विलासने दोघांच्याही कुटुंबीयांची समजूत घातली. परंतु, दोन्ही कुटुंबीयांचा विरोध होता. निराश झालेल्या दोघांचीही विलासने समजूत घालून पळून जाऊन लग्न करण्यासाठी मदतीचे आश्वासन दिले. विलासच्या मदतीने दोघांनी प्रेमविवाह केला. दोघांचाही संसार व्यवस्थित सुरू झाला. वर्षभरानंतर दोघांच्याही कुटुंबीयांनी प्रेमविवाह मान्य करीत त्यांना घरी बोलावले. परंतु, सासरच्या मंडळीच्या डोक्यात तनुश्रीचा राग होता. तनुश्री आणि आशीष यांच्या घरी भावासारखा असलेल्या विलासचे नेहमी येणे-जाणे होते. विलास तिला दवाखान्यात किंवा बाजारात नेत होता. आशीषचाही विलासवर विश्वास होता. दोघांनाही दारूचे व्यसन असल्याने कधी-कधी सोबतच दारू पित होते. हेही वाचा.हरियाणातील एका शेताच्या झोपडीत गाडून ठेवले पिस्तूल…आरोपीने स्वत: शेताचा नकाशा….. संसारात वितुष्ट आशीषच्या मुलीच्या वाढदिवसाला शकुनी नावाची मामी त्यांच्या घरी आली. विलास-आशीष एका खोलीत सोबत दारू प्यायले. दारु जास्त झाल्याने विलास आशीषच्या खोलीत झोपला. जेवण करण्यासाठी सर्व जण आल्यानंतर विलास दिसत नसल्यामुळे तनुश्री त्याला खोलीत बोलवायला गेली. तिच्या पाठोपाठ शकुनी मामीसुद्धा खोलीत पोहचली. विलास आणि तनुश्रीला एका खोलीत मामीने बघितले. तिने लगेच तनुश्री आणि विलासचे अनैतिक संबंध असल्याचे आशीषला सांगितले. त्यामुळे त्यांच्या संसारात वितुष्ट आले. हेही वाचा.नागपूर: पावसामुळे मुंबईचे विमान रद्द, विदर्भ एक्सप्रेसला १२ तास विलंब मित्रासोबत पत्नीचे अनैतिक संबंध असल्याबाबतचे संशयाचे भूत आशीषच्या डोक्यात शिरले. त्याने पत्नीला मारहाण करणे, चारित्र्यावर संशय घेणे सुरू केले. हे प्रकरण भरोसा सेलमध्ये आले. पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे आणि समुपदेशक प्रेमलता पाटील यांनी तिघांचेही समुपदेशन केले. त्यानंतर मामीलाही बोलावण्यात आले. मामीने या प्रकरणात हात झटकल्याने आशीषला पश्चाताप झाला. अखेर पती-पत्नीचा संसार पुन्हा बहरला तर विलासने मात्र आशीषची मैत्री तोडण्याचा निर्णय घेतला.