नागपूर : राज्यात अद्याप विविध शहरातील पालकमंत्री कोण होणार याबाबत उत्सुकता असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी एका कार्यक्रमात नागपूरचे पालकमंत्री कोण होणार याबाबत अप्रत्यक्ष सुतोवाच केले. राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागला. महायुतीच्या तीनही घटक पक्षांना प्रचंड बहुमत मिळाल्यावर देखील त्यांच्यात एकवाक्यता न आल्यामुळे आधी मुख्यमंत्री पदाची घोषणा आणि शपथविधी उशीरा झाली. नंतर राज्यातील मंत्र्यांच्या शपथविधीमध्येही बराच काळ गेला. मंत्र्यांना खाती वाटप करतानाही बरीच वाट बघावी लागली. आता निकाल लागल्यानंतर सुमारे दीड महिन्याचा कालावधी उलटला असला तरी राज्यातील विविध जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची नावांची घोषणा अद्याप झालेली नाही. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत घोषणा करणार असल्याची चर्चा आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिकरित्या घोषणा करण्यापूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमादरम्यान नागपूरच्या होणाऱ्या पालकमंत्र्यांचे नाव अप्रत्यक्ष जाहीर करून टाकले. उल्लेखनीय बाब म्हणजे, नागपूरचे पालकमंत्री म्हणून गडकरी यांनी ज्यांच्या नावाची घोषणा केली ते नेते स्वत: त्या कार्यक्रमात उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : रक्तबंबाळ युवक रस्त्यावर… माजी खासदार थांबले अन्

गडकरी यांनी कुणाचे नाव घेतले।

नागपूरच्या कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा करणाऱ्या समारंभात गडकरी बोलत होते. यावेळी भाषणादरम्यान राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा नावाचा उल्लेख करताना गडकरी यांनी अनावधानाने त्यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख केला. बावनकुळे यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख झाल्यावर स्वत:ला सावरत गडकरी यांनी लगेच याबाबत अद्याप घोषणा झाली नसल्याचे स्पष्ट केले. पालकमंत्री कोण होणार, याबाबत राज्याचे मुख्यमंत्री घोषणा करणार असल्याचे पुढे त्यांनी सांगितले. बावनकुळे अद्याप पालकमंत्री झाले नसले तरी तेच पालकमंत्री होणार असल्याचेही त्यांनी पुढच्या वाक्यात उपस्थितांना सांगितले. तत्पूर्वी बावनकुळे यांनी नागपूर शहरातील मैदानांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाकडून शंभर कोटी रुपये निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फाईल घेऊन जाणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. बावनकुळे यांच्या या घोषणेचा उल्लेख करत गडकरी यांनी बावनकुळे ताकदवान नेते असल्याचे सांगितले. बावनकुळे यांच्यासाठी काहीही अशक्य नाही असे गडकरी म्हणाले. बावनकुळे पुरुषाला स्त्री तर स्त्रीला पुरुष करण्याची ताकद ठेवतात असे गडकरी यांनी गमतीने बावनकुळे यांचे कौतुक करताना सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur bjp leader nitin gadkari said chandrashekhar bawankule will be guardian minister of nagpur tpd 96 css