नागपूर : बनावट ऑनलाईन गेमींग अॅप बनवून देशभरातील हजारो गुंतवणूकदारांची शेकडो कोटींनी फसवणूक करणारा बुकी सोंटू ऊर्फ अनंत जैन याने नागपूर पोलिसांना ‘मामा’ बनवले. पोलिसांच्या रडारवर असलेल्या सोंटू जैन जामीन फेटाळल्याची माहिती मिळताच वेश बदलून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. त्यामुळे नागपूर पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे.
‘ऑनलाईन गेम’च्या तीन पत्ती, रमी आणि कसीनो अशा गेममध्ये पैसे लावल्यास दिवसाला लाखोंचा फायदा करून देण्याचे आमिष दाखवून गोंदियातील सोंटूने विक्रांत अग्रवाल यांची ५८ कोटींनी फसवणूक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच सोंटू दुबईला पळून गेला होता. पोलिसांना तपासात मोठे घबाड हाती लागले. सोंटूच्या घरातून १५ किलो सोने, ३०० किलो चांदी आणि १८ कोटींची रक्कम जप्त केली. तसेच जवळपास १०० कोटींची अन्य मालमत्ता जप्त केली. सोंटू जैनच्या अटकेची प्रक्रिया सुरु असतानाच त्याने उच्च न्यायालयातून जामीन प्राप्त केला होता.
हेही वाचा : हद्दच झाली! परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पेपरचे दहा प्रश्न रद्द
तीन दिवस पोलीस ठाण्यात हजर राहण्याची हमी दिली. मात्र, मंगळवारी सोंटू जैनच्या जामीनावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. जामीन फेटाळल्या जाणार असल्याची माहिती सोंटू जैन आणि पोलिसांनाही माहिती होती. त्यामुळे पोलिसांनी सोंटूवर निगराणी ठेवली. मात्र, सोंटू पोलिसांवर भारी पडला. सदरमधील हॉटेल ब्रीज इनमधून सोंटूने वेश बदलून हॉटेलमधून पलायन केले. एका ऑटोतून तो एका चौकात आला आणि तेथून पुन्हा दुसऱ्या ऑटोने तीन चौकापर्यंत गेला. त्यानंतर त्याने एक गाडी बोलावून शहरातून पळ काढला.
हेही वाचा : डोळ्यांचा पडदा विविध आजारांचे दर्पण बनणार! पद्मश्री डॉ. सचदेव म्हणतात…
६ पथके घेत आहेत शोध
गुन्हे शाखेच्या नाकावर टिच्चून सोंटू फरार झाला. त्याला शोधण्यासाठी गुन्हे शाखेसह ६ पथके सोंटूचा शोध घेत आहेत. सोंटूने मंगळवारी सकाळीच मोबाईल बंद केला होता. त्यामुळे सोंटूचे लोकेशन मिळणे कठीण आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस तपास करीत आहेत. सोंटूचा पासपोर्ट पोलिसांनी जप्त केला आहे. त्यामुळे तो देशाबाहेर जाण्याची शक्यता नाही. सोंटू हा राजकोटच्या एका बुकीचे बँक खाते वापरत होता. त्या खात्यातून नुकतीच मोठी रक्कम दुसऱ्या खात्यात वळती झाल्याची माहिती समोर आली आहे.
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur bookie sontu jain escaped from police custody 58 crore online gaming fraud manipulated betting app adk 83 css